Rahul Gandhi : राहुल गांधी पंतप्रधान होणार? बड्या नेत्याचा दावा

सोलापूर : आमच्या घरात भाजपने फुट पाडली. फुट पाडण्यासाठी आमच्या एका वहिनींचा भाजपने प्रवेश करून घेतला, अशा शब्दांत सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटील यांनी भाजपवर हल्लाबोल केला. तसेच आमचे पालकमंत्री रोज भाषण करतात की विशाल पाटलांना आम्ही घेणार आहोत. अहो.. मी अपक्ष निवडून आलो. भाजपच्या दोन टर्म निवडून आलेल्या खासदाराला पाडून अपक्ष निवडून आलो, असेही विशाल पाटील यांनी यावेळी म्हटले. सोलापूर येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते.
जयश्री पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर विशाल पाटील यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. पाटील म्हणाले, मी जरी अपक्ष असलो तरी काँग्रेसच्या विचाराचा आहे. काँग्रेसचा विचार सहजासहजी दाबता येत नाही. महाराष्ट्रात एकमेव अपक्ष खासदार निवडून आला, पण तो काँग्रेसच्या विचाराचा निवडून आला.
काही व्हायचे आहे ते होऊ दे, आम्हाला तुरुंगात जायला लागले, अडचणीत यायला लागले तरी दहा-वीस विशाल पाटील तुमच्यातून तयार होतील. थांबण्याची आमची क्षमता आहे. चूक केली असेल तर धाडसाने सामोरे जाण्याची गरज होती. स्वत:च्या संस्था बळकट करण्यासाठी लोक सोडून जात असतील, तर त्यांना निश्चित पश्चाताप होणार आहे. या मतदारसंघात काँग्रेसचा विचार मजबूत आहे. मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्ते सामान्याला नेता बनवू शकतात.
राहुल गांधी पंतप्रधान होणार
विशाल पाटील यांनी राहुल गांधी यांच्याविषयी तसेच दिल्लीतील घडामोडीवर भाष्य करताना म्हटले, दिल्लीत रोज काहीतरी चालू आहे. कॉंग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी देशाचे पंतप्रधान म्हणून दिल्लीत बसणार हा दिवस लांब नाही. त्यानंतर सगळे गेलेले सगळे म्हणतील आम्हाला घ्या, आम्हाला घ्या. त्यावेळी घ्यायचे का? असा सवालही त्यांनी उपस्थितांना विचारला.





