शरद पवार यांच्यापुढे लोटांगण घालणार, दोन्ही पवारांनी एकत्र येण्याबाबत काय म्हणाले नरहरी झिरवाळ?

Narhari Zirwal | राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते आणि मंत्री नरहरी झिरवाळ यांनी अन्न व औषध प्रशासन मंत्रिपदाचा पदभार स्वीकारला. मात्र झिरवाळ सध्या अजित पवार यांच्यासोबत असले तरीही शरद पवार यांच्याबद्दल कायम निष्ठा असल्याचे पाहायला मिळाले. यातच आता मंत्री नरहरी झिरवाळ यांनी अजित पवार आणि शरद पवार यांनी एकत्र यावं, अशीही इच्छा व्यक्त केली.
नरहरी झिरवाळ काय म्हणाले?
अजित पवार यांच्या आई आशाताई पवार यांनी पांडुरंगाला पवार कुटुंबातील मतभेद मिटून पुन्हा कुटुंब एकत्र येण्याचे साकडे घातले. यावर नरहरी झिरवाळ यांनी प्रतिक्रिया दिली. “प्रत्येक माणूस एकच मागणी करतो, मग तो विरोधात असो किंवा राष्ट्रवादीतील दोन्ही गटातील असो. प्रत्येकाला हेच वाटतं की दोन्ही पवार हे एकत्र आले पाहिजेत. राजकारणात काही गोष्टी घडत असतात आणि त्या घडून गेल्या आहेत. आम्ही देखील चूक केली असं म्हणा किंवा बरोबर केलं असंही म्हणता येईल. मात्र, आम्हाला विश्वास होता की आम्ही शरद पवारांना सोडून गेलं तर ते आम्हाला वेगळं समजणार नाहीत, म्हणून आम्ही तो निर्णय घेतला. जनतेनेही मला पुन्हा एकदा आमदार केलं. शरद पवार हे सर्वसामान्याचे नेते आहेत. त्यामुळे ते याबाबत विचार करतील,” असा विश्वास झिरवाळ यांनी व्यक्त केला.
शरद पवारांकडे जाऊन लोटांगण घालून पाया पडणार आणि…
पुढे ते म्हणाले, “दोन्ही पवार एकत्र आले पाहिजे ही पांडुरंगाला विनंती करतो. मी पाडुंरंगाच्या शेजारी पवारसाहेबांना पाहतो. पहाटे शपथ झाली तेव्हा मी दिल्लीला पळून गेल्याची माझ्यावर टीका झाली. बजरंगाच्या छातीत प्रभू राम दिसले होते. माझी छाती फाडली तर शरद पवार साहेबच दिसतील, असं सांगतानाच मी ज्या दिवशी अजितदादांसोबत गेलो, त्यानंतर शरद पवार यांच्यासमोर गेलो नाही. कोणत्या तोंडाने मी साहेबांपुढे जाणार? मी साहेबांना प्रभू रामाच्या जवळचं स्थान देतो. आता पवारसाहेबांकडे जाऊन लोटांगण घालून पाया पडणार आणि म्हणणार साहेब काहीही करा पण आमच्या सारखे अनेक आहेत, ज्यांना अडचण झालेली आहे म्हणून एकत्र या”, असं नरहरी झिरवाळ यांनी म्हटले.
मंत्रिपदाबाबत व्यक्त केला आनंद
“आज मी मंत्रिपदाचा पदभार स्वीकारला. मी खूप आनंदी आहे, माझ्याबद्दल जनतेने ज्या अपेक्षा व्यक्त केल्या होत्या. त्या अपेक्षेप्रमाणे माझ्या नेत्यांनी अन्न व औषध प्रशासन हे खातं दिलं. मंत्रिपद मिळण्यास उशीर झालेला नाही. शेवटी राज्य आहे, त्यामुळे अनेकांना अपेक्षा असतात. माझ्यासारखा नशीबवान मीच आहे. कारण मला थेट कॅबिनेट मंत्रिपद मिळाले. मी आधी उपाध्यक्ष झालो, आता मंत्रीही झालो”, असं नरहरी झिरवाळ यांनी म्हटले.
हेही वाचा :
न्यू इअर सेलिब्रेशनच्या व्हिडिओवरून सोनाक्षी सिन्हा ट्रोल; दिवाळीत केलेल्या पोस्टची करून दिली आठवण





