Prashant Koratkar : जामीन फेटाळला; प्रशांत कोरटकर शरण येणार का? पोलिसांचे दोन पथक मागावर

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या आणि इतिहासकार इंद्रजित सामंत यांना शिवीगाळ करत धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूरच्या सत्र न्यायालयाने दणका दिला आहे. प्रशांत कोरटकरने अटकपूर्व जामिनासाठी कोल्हापूरच्या कोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र, कोल्हापूर कोर्टाने प्रशांत कोरटकरचा जामिन अर्ज फेटाळला आहे. अंतरिम जामिनाचा अर्जच फेटाळण्यात आल्यामुळे त्याला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
तर दुसरीकडे अटकपूर्व जामिनासाठी प्रशांत कोरटकर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज करणार असल्याची माहिती मिळत आहे. प्रशांत कोरटकर हा गेल्या 25 फेब्रुवारी पासून फरार असून अटकपूर्व जमीन मंजूर असतांना देखील प्रशांत कोरटकर आपली बाजू मांडायला व आवाजाचे नमुने द्यायला पोलिसांपुढे पुढे आला नाही हे विशेष आहे. इतिहासकार इंद्रजित सावंत यांना शिवीगाळ करतांना छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याचा आरोप प्रशांत कोरटकरवर आहे.
या प्रकरणी गुन्हा दाखल असून अटकपूर्व जामीन रद्द झाल्यानंतर कोल्हापूर पोलिसांचे दोन पथक प्रशांत कोरटकरच्या मागावर आहेत. कोल्हापूर पोलिसांचे पथक नागपूरच्या दिशेने रवाना झाले आहे. मात्र, अटकपूर्व जामीन फेटाळला शिवाय सात दिवसांची मुदतवाढ देखील नाकारली असं असतानाही प्रशांत कोरटकर पोलिसांना शरण आलेला नाही. त्यामुळे अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
नेमकं प्रकरण काय आहे?
प्रशांत कोरटकरने काही दिवसांपूर्वी इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना फोन केला होता. हा फोन करून त्याने सावंत यांना जीवे मारण्याची धमकी दिली, असा आरोप करण्यात आला आहे. सोबतच यावेळी कोरटकरने छत्रपती शिवाजी महाराज तसेच छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी अवमानकारक भाष्य केल्याचाही आरोप आहे. याच प्रकरणात कोरटकरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर कोरटकरने अंतरिम जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने मात्र हा अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे आता कोरटकर याला कधीही अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.





