‘… तेव्हा वक्फ विधेयक रद्द करणार’, ममता बॅनर्जींचे मोठे विधान, भाजपवर साधला निशाणा

Waqf (Amendment) Bill 2025 | वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर झाले आहे. जवळपास 12 तासांच्या चर्चेनंतर हे विधेयक मंजूर झाले. आता यावरून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोठे विधान केले आहे. भाजपचे सरकार जाताच वक्फ विधेयक रद्द केले जाईल, असे वक्तव्य त्यांनी केले आहे. तसेच, वक्फ विधेयकाच्या माध्यमातून भाजप देशाला विभागण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
ममता बॅनर्जी म्हणाल्या की, भाजपने देशाला तोडण्यासाठी वक्फ (सुधारणा) विधेयक आणले आहे. जेव्हा केंद्रातील भाजपचे सरकार जाईल आणि नवीन सरकार येईल, तेव्हा हे वक्फ विधेयक रद्द करण्यासाठी सुधारणा करण्यात येईल.”
लोकसभेत तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी या विधेयकाच्या विरोधात मतदान केले.तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी वक्फ (सुधारणा) विधेयक, 2025 राज्यांच्या अधिकारांवर अतिक्रमण करणारे असल्याचे म्हणत संसदेला या संदर्भात कायदा करण्याचा कोणताही अधिकार नसल्याचा दावा केला.
असे कायदे पारित करण्याचा अधिकार केवळ राज्यांना आहे आणि हे विधेयक पूर्णपणे असंवैधानिक आहे, असे म्हणत त्यांनी विधेयकाला विरोध केला.
दरम्यान, मोदी सरकारने वक्फ विधेयक लोकसभेत मंजूर करून घेतले आहे. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी हे विधेयक लोकसभेत मांडले होते व यावर 12 तास चर्चा झाली. एनडीएच्या 288 खासदारांनी रात्री उशिरा सभागृहात विधेयकाच्या समर्थनार्थ मतदान करून विधेयक मंजूर केले. विधेयकाच्या विरोधात 232 खासदारांनी मतदान केले. आता हे विधेयक राज्यसभेत मांडले जाणार आहे.





