Pakistan : पाकिस्तानचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल सय्यद आसिम मुनीर यांनी गुरुवारी अफगाणिस्तानला कडक इशारा दिला आहे. पाकिस्तानविरुद्ध दहशतवादी कारवाया करण्यासाठी अफगाण भूमीचा वापर करणे कदापि खपवून घेतले जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. रावळपिंडी येथे ‘अहल-ए-तशीह’ (शिया) पंथाच्या धर्मगुरूंशी संवाद साधताना त्यांनी हे विधान केले. मुनीर यांनी या लष्करी मोहिमेचा संदर्भ देत सांगितले की, पाकिस्तानविरुद्ध कार्यरत असलेल्या दहशतवाद्यांच्या पायाभूत सुविधा नष्ट करण्याचा आमचा निर्धार पक्का आहे. २६ फेब्रुवारी रोजी अफगाण तालिबान दलांच्या सीमावर्ती हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने हे अभियान सुरू केले होते. अफगाण तालिबानने आपल्या भूमीवरून होणाऱ्या भारतविरोधी किंवा इतर दहशतवादी कारवाया रोखणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, प्रादेशिक तणाव कमी करण्यासाठी सुरू असलेल्या मुत्सद्देगिरीचे त्यांनी कौतुक केले. pakistan लष्करप्रमुख मुनीर यांनी देशात हिंसाचार भडकवण्यासाठी धार्मिक भावनांचा गैरवापर होऊ नये आणि अतिरेकी प्रवृत्तींचा सामना करण्यासाठी उलेमांनी महत्त्वाची भूमिका बजावावी, असे आवाहन त्यांनी केले. दुसऱ्या देशांतील घटनांच्या आधारे पाकिस्तानमध्ये होणारा हिंसाचार सहन केला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. युद्धबंदीची पार्श्वभूमी : काबुलमधील रुग्णालयावरील हल्ल्यानंतर उभय देशांत तणाव वाढला होता. मात्र, सौदी अरेबिया, तुर्कस्तान आणि कतार यांच्या विनंतीवरून, ईद-उल-फित्रच्या निमित्ताने पाकिस्तान आणि अफगाणिस्तानने लढायांना तात्पुरती स्थगिती देण्याची घोषणा केली आहे. या संवादादरम्यान उपस्थित उलेमांनी शांतता प्रस्थापित करण्यासाठी सुरक्षा यंत्रणांना आपला पूर्ण पाठिंबा दर्शवला.