Mahayuti : महायुतीत वादाची ठिणगी; राष्ट्रवादीसोबत लढणार नाही, शिंदे गटाच्या आमदारांचा तटकरेंवर रोष

Local Body Elections : रायगड जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, महायुतीतील शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यातील वाद उफाळून आला आहे. शिवसेना आमदार महेंद्र दळवी आणि मंत्री भरत गोगावले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांच्यावर थेट आरोप करत, त्यांच्यासोबत कोणतीही निवडणूक लढणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
महाड येथे भरत गोगावले यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात, आमदार दळवी यांनी तटकरे यांना “चिटर फॅमिली” असा उल्लेख करत, रायगडच्या राजकारणातून त्यांना हद्दपार करण्याचे आवाहन केले आहे.
दळवी यांनी म्हटले की, “आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुका महायुती म्हणून लढणार आहोत, परंतु त्यात सुनील तटकरे किंवा राष्ट्रवादी काँग्रेस नसेल,” अशी स्पष्ट भूमिका आमदार दळवी यांनी मांडली.
मंत्री भारत गोगावले यांनीही सुनील तटकरे यांच्यावर निशाणा साधत, “कोकणात महायुती नाही तर युती” असे वक्तव्य केले. त्यांनी ‘नॅपकिन स्टाईल’चा उल्लेख करत तटकरे यांच्यावर टीका केली आणि त्यांच्या समर्थकांनी कार्यक्रमात नॅपकिन्स वाटप करून तटकरे यांना डिवचले.
दरम्यान, या वादामुळे महायुतीतील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले असून, रायगड जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांनी तटकरे यांच्याविरोधात उघडपणे आक्रमक भूमिका घेतल्याने, आगामी निवडणुकांमध्ये महायुतीच्या एकसंधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.





