पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री आणि जेडीयूचे अध्यक्ष नितीश कुमार यांचे पुत्र निशांत कुमार यांच्या राजकारण प्रवेशाची चर्चा सतत होते. आता त्यांचे राजकारणात सक्रिय होणे जवळपास निश्चित झाल्याचे संकेत मिळत आहेत. बिहारमध्ये नुकतीच विधानसभा निवडणूक झाली. त्यामध्ये प्रचंड यश मिळवून जेडीयू, भाजप आणि मित्रपक्षांच्या आघाडीने (एनडीए) सत्ता राखली. त्यामुळे नितीश यांनी सलग पाचव्या कार्यकाळासाठी मुख्यमंत्रिपदाची सुत्रे स्वीकारली. त्यानंतर ते प्रथमच दोन दिवसीय दौऱ्यासाठी रविवारी दिल्लीत दाखल झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एनडीएच्या इतर नेत्यांच्या भेटीसाठी तो दौरा असल्याचे सांगण्यात आले. मात्र, निशांत (वय ५०) यांचा संभाव्य राजकारण प्रवेशही नितीश यांच्या भेटीगाठींच्या अजेंड्यावर असल्याची माहिती पुढे येत आहे. जेडीयूचे पदाधिकारी बनवून निशांत यांच्या राजकारणातील एन्ट्रीचा मार्ग मोकळा केला जाऊ शकतो. नववर्षात बिहार विधान परिषदेच्या काही जागांसाठी निवडणूक होईल. त्याशिवाय, त्या राज्यातून राज्यसभेवर निवडून द्यावयाच्या काही जागांसाठीही निवडणूक होणार आहे. त्यामुळे निशांत यांना आमदार किंवा खासदार बनवले जाऊ शकते, असे अंदाजही वर्तवले जाऊ लागले आहेत. जेडीयूचे कार्याध्यक्ष संजयकुमार झा यांनी काही दिवसांपूर्वीच नितीशपुत्राविषयी भाष्य केले. निशांत यांनी राजकारणात सक्रिय व्हावे अशी पक्षातील अनेकांची इच्छा असल्याचे त्यांनी म्हटले. एवढेच नव्हे तर, निशांत यांच्या राजकारण प्रवेशासाठी जेडीयूमध्ये प्लॅनिंगही सुरू झाल्याची माहिती समोर येत आहे.