नरेंद्र मोदी वयाच्या 75 व्या वर्षी पंतप्रधानपद सोडतील का? भाजपचे निवृत्ती धोरण समजून घ्या

नागपूर: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत यांनी अलीकडेच 75 वर्षे वय आणि निवृत्ती याबाबत केलेल्या वक्तव्यमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. नागपुरात एका कार्यक्रमात बोलताना भागवत म्हणाले, “75 वर्षे पूर्ण झाल्यावर नेत्यांनी इतरांना संधी द्यावी.” या विधानावरून विरोधी पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.
काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी चिमटा काढताना म्हटले, “17 सप्टेंबर 2025 रोजी पंतप्रधान मोदी 75 वर्षांचे होणार आहेत, हे सरसंघचालकांनी त्यांना आठवण करून दिली. पण मोदीही भागवतांना सांगू शकतात की, 11 सप्टेंबर 2025 रोजी तुम्हीही 75 वर्षांचे होणार आहात! एक बाण, दोन निशाणे!” शिवसेना (यूबीटी) नेते संजय राऊत यांनीही यावर भाष्य करत म्हटले, “मोदींनी आडवाणी, मुरली मनोहर जोशी, जसवंत सिंग यांना सक्तीने निवृत्ती दिली. आता स्वतः मोदी हे धोरण पाळणार का, हे पाहावे लागेल.”
75 वर्षांच्या चर्चेचा उगम कधीपासून?
75 वर्षे वय आणि निवृत्ती याबाबतची चर्चा 2014 मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाल्यापासून सुरू झाली. त्या वेळी भाजपने अनेक ज्येष्ठ नेत्यांना ‘मार्गदर्शक मंडळ’ात पाठवले होते. यामुळे पक्षात बरीच उलथापालथ झाली होती. लालकृष्ण आडवाणी यांना 2014 च्या लोकसभा निवडणुकीत तिकीट देण्यात आले, परंतु सरकार स्थापनेनंतर त्यांना मार्गदर्शक मंडळात स्थान देण्यात आले. याचप्रमाणे माजी भाजप अध्यक्ष मुरली मनोहर जोशी यांनाही मार्गदर्शक मंडळात पाठवण्यात आले. तेव्हा असा दावा करण्यात आला होता की, भाजप 75 वर्षांनंतर आपल्या नेत्यांना सक्रिय राजकारणातून निवृत्त करेल.
लोकसभा निवडणुकीतही गाजला होता निवृत्तीचा मुद्दा –
2024 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला. तिहार तुरुंगातून सुटल्यानंतर दिल्लीचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि आप नेते अरविंद केजरीवाल यांनी दावा केला होता की, सप्टेंबर 2025 मध्ये पंतप्रधान मोदी 75 वर्षांचे होतील आणि ते पंतप्रधानपद सोडतील. त्यानंतर गृहमंत्री अमित शाह यांना पंतप्रधानपद मिळेल. केजरीवाल यांनी उत्तर प्रदेशात प्रचारादरम्यान असाही दावा केला होता की, अमित शाह यांच्या इशाऱ्यावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाही हटवले जाईल. या दाव्यांनी राजकीय वातावरण तापले होते.
अमित शाह यांनी दिले होते स्पष्टीकरण –
या चर्चांना पूर्णविराम देण्यासाठी गृहमंत्री अमित शाह यांनी हैदराबाद येथील पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण दिले होते. ते म्हणाले, “नरेंद्र मोदी आपला तिसरा कार्यकाळ पूर्ण करतील. अरविंद केजरीवाल आणि इंडिया आघाडीला सांगू इच्छितो की, मोदीजी 75 वर्षांचे झाल्याने आनंद साजरा करण्याची गरज नाही. भाजपच्या संविधानात असा कोणताही नियम नाही की मोदी पंतप्रधान होऊ शकत नाहीत. ते पुन्हा पंतप्रधान होतील आणि कार्यकाळ पूर्ण करतील.” याशिवाय, शाह यांनी हेही स्पष्ट केले होते की, 2024 ते 2029 चा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर 2029 च्या लोकसभा निवडणुकीतही नरेंद्र मोदी हेच भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील.
संविधानात निवृत्तीचा उल्लेख नाही –
भारताच्या संविधानात पंतप्रधानपदासाठी वयाची कोणतीही मर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही. कोणतीही व्यक्ती वय कितीही असले तरी पंतप्रधानपदावर राहू शकते. तसेच, भाजपच्या संविधानातही 75 वर्षांनंतर निवृत्तीचा कोणताही नियम नाही, असे अमित शाह यांनी आधीच स्पष्ट केले आहे. तरीही, ज्या काळात पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली 75 वर्षांवरील नेत्यांना सक्रिय राजकारणातून बाजूला करण्यात आले, तेच मोदी स्वतः 75 वर्षांचे झाल्यावर पद सोडणार का, हा प्रश्न कायम आहे.
भागवतांच्या विधानाने पुन्हा चर्चेला उधाण –
मोहन भागवत यांच्या ताज्या विधानाने हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. हा निर्णय भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच घ्यायचा आहे. मात्र, भागवत यांच्या निवृत्तीविषयक वक्तव्याने या विषयाला नव्याने हवा मिळाली आहे. आता येत्या काही महिन्यांत याबाबत काय घडते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.





