लाडक्या बहिणींना दिवाळीचा हप्ता मिळणार की नाही? eKYC बाबत अडचण चिंता वाढली…

Ladki Bahin Yojana | महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी इलेक्ट्रॉनिक नो योर कस्टमर (ई-केवायसी) सत्यापन अनिवार्य केले आहे. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दोन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.
नोव्हेंबरपूर्वी ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. मात्र ई-केवायसी दरम्यान तांत्रिक अडचण निर्माण होत असल्याने महिलांनी चिंता व्यक्त केली आहे. यातच आता सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता ई-केवायसी नसल्याने थांबवण्यात येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
परंतु लाडकी बहीण योजनेच्या सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्यासाठी ई-केवायसी करणे बंधनकारक असल्याचा कोणताही निर्णय सरकारने जाहीर केलेला नाही. पण दोन महिन्यात ई-केवायसी करणे आवश्यक असल्याने नोव्हेंबरचा हप्ता आणि त्यापुढील हप्ते हे ई-केवायसी अभावी थांबवले जाऊ शकतात. परंतु सध्या सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता eKYC अभावी थांबवण्यात येईल, असा कोणताही निर्णय झालेला नाही.
eKYC प्रक्रिया अधिक सुलभ आणि सुकर होईल; अदिती तटकरेंचे आश्वासन
दरम्यान, महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी या तांत्रिक अडचणीवर काम सुरू असल्याचे सांगितले आहे. “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे eKYC करताना OTP संदर्भात काही तांत्रिक अडचणी येत असल्याचे निदर्शनास आले आहे. महिला व बालविकास विभागाने या बाबीची गांभीर्याने दखल घेतली असून तज्ज्ञांच्या माध्यमातून उपाययोजना सुरू आहेत. लवकरच ही अडचण दूर होऊन eKYC प्रक्रिया अधिक सुलभ आणि सुकर होईल, याची मी सर्व लाडक्या बहिणींना खात्री देत असल्याचे,” अदिती तटकरे यांनी सांगितले होते.
गेल्या वर्षी दिवाळीच्या काळात सरकारने दोन हप्ते अॅडव्हान्समध्ये दिले होते. मात्र यंदाच्या दिवाळीसाठी लाडक्या बहिणी हप्ताची प्रतिक्षा करत आहेत.
ई-केवायसी प्रक्रिया कशी पूर्ण कराल?
- ladkibahin.maharashtra.gov.in या पोर्टलला भेट द्या. लॉगिन केल्यावर ईकेवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याविषयीचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.
- तुमचा आधार क्रमांक नोंदवा.
- त्यानंतर कॅप्चा कोड तिथे नोंदवा.
- आधार प्रमाणिकरणासाठी मंजूरी द्या. Send OTP या पर्यायावर क्लिक करा.
- आधारशी लिंक मोबाईलवर आलेला OTP टाका आणि Submit करा.
- त्यानंतर पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक, कॅप्चा आणि OTP नमूद करा.
- लाभार्थी लाडकी बहिणीचा जात प्रवर्ग निवडा आणि आवश्यक प्रमाणपत्रांची पुष्टी करा.
- सर्व माहिती तपासून Submit बटणावर क्लिक करा.
- eKYC पडताळणी यशस्वीरीत्या पूर्ण झाली असा संदेश स्क्रीनवर दिसेल.
बनावट वेबसाइट्सपासून सावध रहा
महिला व बालविकास मंत्रालयाने सांगितले की, ई-केवायसीसाठी फक्त अधिकृत वेबसाइट वरच भेट द्यावी. गूगलवर शोधताना दिसणाऱ्या https://hubcomut.in/ सारख्या बनावट वेबसाइट्सपासून सावध राहण्याचा इशारा अधिकाऱ्यांनी दिला आहे. अशा बनावट वेबसाइट्सवर केवायसी केल्यास लाभार्थ्यांचे बँक खाते, आधार तपशील आणि वैयक्तिक माहिती गैरवापर होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे सायबर फसवणुकीला बळी पडण्याचा धोका आहे. Ladki Bahin Yojana |
हेही वाचा:





