Satara : लाडकी बहिण योजनेचे बुजगावणे उभे करुन ईव्हीएम घोटाळा लपवला

कराड : विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारने लाडकी बहिण योजनेची अंमलबजावणी करत महिलांना आर्थिक लाभ दिला. लाडक्या बहिणींनी आम्हाला निवडणुकीत मते दिल्याचे सांगितले. मात्र, लाडकी बहिण योजनेचे बुजगावणे उभे करुन सरकारने ईव्हीएम घोटाळा लपवला असून त्या घोटाळ्यावर पांघरूण घातले आहे, अशी टीका माजी मंत्री बच्चू कडू यांनी महायुतीवर केली.
येथील शासकीय विश्रामगृहात मंगळवारी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष मनोज माळी, भानुदास डाईगडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. बच्चू कडू म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल, दिव्यांग बांधवाचं मानधन असेल यांसह विविध मागण्यांसाठी बारामतीपासून आंदोलन सुरु करतो आहे.
सरकारचा पूर्ण अर्थसंकल्प सामान्य माणसापासून दूर गेला याची मांडणी बारामतीत अर्थमंत्र्याच्या गावी करणार आहोत. राज्यात पैसाच नाही असे सरकार सांगत आहे. आम्ही पैसा कसा निघू शकतो त्याची मांडणी करणार आहोत. गोरगरिबांचे, शेतकऱ्यांचे रक्त सांडू नका, रक्तदान करून तरी तुमच्या सरकारला अक्कल येऊ दे, रक्तदान आंदोलन करून याची सरकारला जाणीव करून देणार आहोत.’’
तमिळनाडूचा अर्थसंकल्प ३ लाख कोटींचा असूनही कृषी क्षेत्रासाठी ४५ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मग महाराष्ट्रात असे का होत नाही? उत्तर प्रदेशसारख्या राज्याचा अर्थसंकल्प साडेआठ लाख कोटींचा आहे. तेथेही शेतकऱ्यांसाठी ४५ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, महाराष्ट्राचा साडेसात लाख कोटींचा अर्थसंकल्प असूनही केवळ ९ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांसाठी दिले गेले आहेत. हा शेतकऱ्यांचा अपमान आहे, असे बच्चू कडू सांगितले.
इकडे वेळेत पगार.. अन इकडेआंदोलन
अर्थमंत्री अजित पवार पहिल्यांदा आमदार झाले तेव्हा त्यांचा पगार 55 हजार रुपये होता. आता त्यांचा पगार साडेतीन लाखांवर गेला आहे. तो पगारही वेळेत मिळतो. मी माजी आमदार आहे, माझी ही पेन्शन मला वेळेत मिळते. मात्र, शेतकऱ्यांना भाव मिळत नाही. सध्या जो भाव आहे. त्यातच पडझड होत असते. त्यामुळे हा विरोधाभास गरीब श्रीमंतीमधील दुरी दर्शवतो. आमदार- खासदारांना वेळेत पगार मिळतो. मात्र, आमच्या शेतकऱ्यांना, दिव्यांग बांधवांना हक्काच्या पैशासाठी आंदोलन करावे लागते ही दुर्दैवी गोष्ट आहे, असे श्री. कडू यांनी सांगितले.





