Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट.! जुलै-ऑगस्टचे ३ हजार रुपये एकत्र मिळणार?

मुंबई : महाराष्ट्रातील ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण‘ योजनेच्या लाभार्थी महिलांना रक्षाबंधनाच्या निमित्ताने मोठी भेट मिळणार आहे. जुलै २०२५ चा हप्ता अद्याप खात्यात जमा न झाल्याने महिलांमध्ये चर्चा सुरू होती. मात्र, आता जुलै आणि ऑगस्टचे एकत्रित ३,००० रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात लवकरच जमा होणार आहेत, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. यामुळे यंदाही रक्षाबंधनाचा सण राज्यातील महिलांसाठी आनंदाचा ठरणार आहे.
महाराष्ट्र सरकारने जुलै २०२४ पासून सुरू केलेल्या या योजनेत पात्र महिलांना दरमहा १,५०० रुपये थेट त्यांच्या आधार-लिंक केलेल्या बँक खात्यात जमा केले जातात. आतापर्यंत ११ हप्ते वितरित झाले असून, २.२५ कोटी महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर दोन महिन्यांचा हप्ता एकत्र जमा करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, ज्यामुळे लाभार्थी महिलांना आर्थिक दिलासा मिळेल.
२६ लाख अर्ज पडताळणीच्या फेऱ्यात
या योजनेच्या अंमलबजावणीत काही त्रुटी आढळल्याने सरकारने २६.३४ लाख अर्जांची पडताळणी सुरू केली आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की, काही लाभार्थी एकापेक्षा जास्त शासकीय योजनांचा लाभ घेत आहेत, तर काही कुटुंबांमध्ये दोनपेक्षा जास्त लाभार्थी आढळले आहेत. विशेष म्हणजे, १४,२९८ पुरुषांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे उघड झाले आहे, ज्यामुळे विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
विरोधकांनी या प्रकरणावरून सरकारला कोंडीत पकडले आहे. “निवडणुकीच्या तोंडावर २६ लाख अर्ज कसे मंजूर झाले? योजनेची अंमलबजावणी करताना सरकारने कोणती खबरदारी घेतली?” असा सवाल काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी उपस्थित केला आहे.
त्या म्हणाल्या, “हा केवळ आर्थिक घोटाळा नाही, तर पात्र लाडक्या बहिणींचा विश्वासघात आहे. याप्रकरणी स्वतंत्र चौकशी व्हायला हवी.” राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) चे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनीही, “सर्वसामान्य जनतेचा पैसा चुकीच्या पद्धतीने वाटला गेला,” अशी टीका केली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकरणी कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. “ही योजना गरीब महिलांसाठी आहे. अपात्र लाभार्थ्यांनी घेतलेली रक्कम वसूल केली जाईल, आणि गैरफायदा घेणाऱ्यांवर कारवाई होईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.





