कॉंग्रेसची आणखी एक गॅरंटी मोदी हायजॅक करणार का? जातगणनेवरून जयराम रमेश यांचा सवाल

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जातगणनेला हिरवा झेंडा दाखवला आहे. आता कॉंग्रेसची आणखी एक गॅरंटी पंतप्रधान नरेंद्र मोदी हायजॅक करणार का आणि जातगणना करणार का, असे सवाल त्या पक्षाकडून करण्यात आले. विशिष्ट समुदाय किंवा जातींशी संबंधित आकडेवारी गोळा करायला आमची कुठलीही हरकत नाही. मात्र, त्या माहितीचा वापर संबंधितांच्या कल्याणासाठी व्हायला हवा. माहितीचा वापर निवडणूक लाभासाठी राजकीय साधन म्हणून होऊ नये, अशी भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून नुकतीच मांडण्यात आली.
त्यावर कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी संघाबरोबरच मोदींनाही घेरले. संघाच्या उपदेशपर भूमिकेमुळे काही मूलभूत प्रश्न निर्माण होतात. जातगणनेविषयी संघाकडे नकाराधिकार आहे का? जातगणनेला परवानगी देणारा संघ कोण आहे? निवडणूक प्रचारासाठी जातगणनेचा गैरवापर केला जाऊ नये असे म्हणणाऱ्या संघाला न्यायाधीश किंवा पंच बनायचे आहे का? आरक्षणाची ५० टक्के मर्यादा हटवण्यासाठी घटनादुरूस्तीची गरज आहे. त्यावर संघाने गूढ मौन का बाळगले आहे, अशा प्रश्नांची सरबत्ती त्यांनी सोशल मीडियावरून केली.
कान पकडून जातगणना करवून घेऊ-लालू
राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव हेही जातगणनेच्या मुद्द्यावर सोशल मीडियावरून व्यक्त झाले. संघ आणि भाजपवाल्यांचे कान पकडून, दंड-बैठका करायला लावून त्यांच्याकडून जातगणना करवून घेऊ. जातगणना न करण्याचा त्यांना अधिकार काय? जातगणना करण्यासाठी त्यांना भाग पाडू. दलित, मागास, आदिवासी आणि गरिबांनी ऐक्य दाखवण्याची वेळ आता आली आहे, असे त्यांनी म्हटले.
भाजपने दिले जोरदार प्रत्युत्तर
जातगणनेविषयी मांडलेल्या भूमिकेवरून भाजपने लालूंना जोरदार प्रत्युत्तर दिले. लालूंची भाषा गुंडासारखी आहे. बिहारमधील आगामी निवडणुकीत जनता लालूंना आणि त्यांच्या पक्षाला धडा शिकवेल. भाजप धमक्यांना बिल्कूल घाबरत नाही, असे बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी म्हटले. लालू म्हणजे बिहारसाठी शाप आहेत. त्यांनी बिहारची प्रतिमा मलिन केली.
बिहारी या शब्दाला त्यांच्यासारख्यांमुळे शिवीचे स्वरूप प्राप्त झाले. तशा लोकांपासून बिहारला मुक्त करण्याची प्रतिज्ञा आम्ही केली आहे, अशी प्रतिक्रिया दुसरे उपमुख्यमंत्री विजयकुमार सिन्हा यांनी दिली. भाजपचे खासदार संजय जयस्वाल यांनीही लालूंवर निशाणा साधला. बिहारमध्ये याआधीच जात सर्वेक्षण झाले. त्याला भाजपने पाठिंबा दिला. जात सर्वेक्षण न करणाऱ्या कॉंग्रेसशासित राज्यांविषयी लालू प्रश्नचिन्ह का उपस्थित करत नाहीत, असा सवाल त्यांनी केला.





