Sangli News : सांगलीतील काही काँग्रेस नेत्यांना भाजपमध्ये जाऊन मंत्री होण्याचे वेध लागले आहेत. काँग्रेसला पाठिंबा दिलेले अपक्ष खासदार विशाल पाटील यांनी नुकताच एका कार्यक्रमात भविष्यात मी काँग्रेस सोबत जाईन नाही तर दुसऱ्या कोणत्या तरी पक्षात जाईन, असं विधान केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता सांगली जिल्ह्यासह काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. मिरजेतील एका कार्यक्रमात ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे व खासदार विशाल पाटील उपस्थित होते. या कार्यक्रमात विशाल पाटील यांनी एका योगायोगाचा उल्लेख केला आहे. काय म्हणाले विशाल पाटील? विशाल पाटील म्हणाले, जयकुमार गोरे प्रथम अपक्ष म्हणून निवडून आले. नंतर ते काँग्रेसमधून आमदार झाले. पुढे भाजपमध्ये गेले, आमदार झाले, मंत्रीही झाले. मीही अपक्ष म्हणून खासदार झालो आहे. मी भविष्यात काँग्रेसमध्ये जाईन अथवा कोणत्या तरी पक्षात जाईन. पण कुठे तरी आम्हालाही पुढे जाऊन मंत्रीपद मिळावे. दरम्यान, अपक्ष खासदार विशाल पाटील यांचे भाजपचे नेते पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी जमलेले सूर आणि पालकमंत्री पाटील यांनी त्यांना भाजपमध्ये येण्याचे दोनदा केलेले आवाहन, या निमित्ताने चर्चेत आले. लोकसभा निवडणुकीत विशाल पाटील यांना निवडून आणण्यासाठी काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांनी अप्रत्यक्ष मदत केल्याची चर्चा राज्यभर रंगली होती. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत सांगलीची जागा महाविकास आघाडीत ठाकरेंच्या शिवसेनेला सुटली होती. मात्र, काँग्रेस नेत्यांनीच या निवडणुकीत आघाडी धर्म पाळला नाही, अशी चर्चा होती. विश्वजीत कदम यांच्या प्रयत्नामुळेच विशाल पाटील हे लोकसभेत पोहोचले होते. विजयी झाल्यानंतर विश्वजित कदम विशाल पाटील यांना दिल्लीत घेवून गेले होते. त्यांची मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी यांची भेट घालून दिली होती. शिवाय पाटील यांनी काँग्रेसला ही पाठिंबा जाहीर केला होता. आता मात्र विशाल पाटील यांची भूमीका बदलली आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.