शेख : स्थायी समितीच्या बैठकीत अनेक कामांना मंजुरी
नगर – प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत महापालिकेने बांधलेल्या सदनिकेतील लाभार्थ्यांकडे त्यांच्या हिस्साचे पैसे देण्यासाठी नसल्याची बाब महापालिकेच्या स्थायी समिती बैठकीत समोर आली आहे. ही बाब लक्षात येताच स्थायी समितीचे सभापती मुद्दसर शेख यांनी लाभार्थ्यांच्या हिस्सातील पहिल्या टप्प्याची रक्कम निम्मी करण्याचा तसेच या लाभार्थ्यांना अर्थसाहाय्य मिळण्यासाठी व त्यांना योजनेची माहिती मिळण्यासाठी मेळावा घेण्याचा निर्णय घेतला. या योजनेचे 840 लाभार्थी आहेत.
महापालिकेची स्थायी समितीची सभा सोमवार (दि.19) रोजी महापालिकेत झाली. यावेळी स्थायी समितीचे सभापती मुदस्सर शेख, नगरसेवक गणेश भोसले, कुमार वाकळे, अविनाश घुले, सुभाष लोंढे, शोभा बोरकर, गणेश कवडे, मनोज कोतकर, संध्या चितळे, योगीराज गाडे, उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे, नगरसचिव एस.बी. तडवी, शहर अभियंता विलास सोनटक्के, वित्त व लेखा परीक्षक चंद्रकांत खरात आदींसह महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
या बैठकीत महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान, फेज 2 पाणी योजना, नागरी दलितेत्तर वस्ती सुधार योजना, प्रधानमंत्री आवास योजना आदींच्या कामांना मंजुरी देण्यात आली. प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत महापालिकेने केडगाव येथे 624 तर नालेगावमध्ये 216 सदनिकांसाठी सोडत काढण्यात आली होती. यातील लाभार्थ्यांना सुरवातीला पहिला हिस्सा म्हणून एक लाख रुपये भरण्यास महापालिकेकडून सांगण्यात आले. मात्र, या लाभार्थ्यांकडे ऐवढी मोठी रक्कम नाही. हे सर्व लाभार्थी अतिशय गरीब कुटूंबातील असल्याची बाब नगरसेवकांनी मांडली. सभापतींनीही प्रशासनाच्या ही बाब लक्षात आणून दिली.
या लाभार्थ्यांना अर्थसहाय्य देण्यासाठी केंद्र शासनाने दोन वित्तसंस्थांना मान्यता दिली आहे. तसेच यापेक्षाही जास्त वित्तसंस्था अर्थसहाय्य देण्यासाठी मेळावा तर या योजनेतील अटी व इतर आर्थिक बाबींची माहिती नागरिकांना होण्यासाठी महापालिका प्रशासन लवकरच लाभार्थ्यांची बैठक घेणार आहे. लाभार्थ्यांकडून एक लाख रुपयां ऐवजी 25-25 हजार रुपयांचे दोन हप्तेच घ्यावेत. त्यासाठी एक महिन्यांची मुदत देण्यात यावी. ही रक्कम मुदतीत न भरल्यास प्रतिज्ञा यादीतील लोकांना संधी द्यावी अशी सूचनाही सभापती शेख यांनी केली.