सावरकरांच्या अवमानाबाबत कोर्टात जाणार

नातू सात्यकी सावरकर यांचा इशारा
पुणे – ब्रिटिश आणि स्वकियांसोबत एकाचवेळी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लढा दिला. अंदमानमध्ये दोनवेळा काळ्यापाण्याची शिक्षा मिळणार असे समजल्यानंतरदेखील सावरकर डगमगले नाहीत. त्यांनी स्वातंत्र्यासाठी अनेक हालअपेष्टा सहन केल्या. मात्र, त्यांच्याविषयी अवमानकारक आणि हीन दर्जाचे लेखन केले जात आहे. हे दुर्दैवी असून त्याविरोधात न्यायालयात जाणार आहे, असे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर म्हणाले.
स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत पुस्तिकामध्ये हीन दर्जाचे लेखन केले आहे. याचा निषेध करण्यासाठी शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीच्या वतीने स्वातंत्र्यशाहीर सावरकर आणि अन्य शाहिरांच्या पोवाडे गायनातून सावरकरांच्या पुतळ्यासमोर राष्ट्रभक्तीचा शाहिरी जागर करण्यात आला.
यावेळी अभ्यासक अक्षय जोग, प्रबोधिनीचे अध्यक्ष शाहीर हेमंत मावळे, शुभांगी आफळे, मोहन शेटे, अरुणकुमार बाभुळगावकर, महादेव जाधव, प्रा.संगीता मावळे आदी उपस्थित होते. सावरकरांनी समाजप्रबोधनासाठी शाहिरी, काव्य, पोवाडा असे अनेक प्रकार हाताळले. मातृभूमी स्वतंत्र व्हावी, याकरिता शाहिरी काव्यांचे लेखन केले. मात्र, अशा स्वातंत्र्यवीराचा स्वकियांनी अपमान करावा, हे दुर्देवी आहे. सावरकरांचे विचार देशभर नव्हे, तर जगभर पोहोचविणे हीच त्यांना खरी आदरांजली आहे, असे जोग म्हणाले.
कॉंग्रेसजनांना बुद्धी यावी, यासाठी हा शाहिरी कार्यक्रम करण्यात आला. सावरकर हे आमचे शाहीर आहेत. प्रत्येकाने सावरकरांच्या अवमानाचा निषेध करायला हवा, असे मावळे म्हणाले.





