‘ट्रॉफी भारताला देईल, पण…’; मोहसिन नकवींचा ड्रामा सुरूच; ठेवली एक विचित्र अट

Asia Cup Trophy | भारतीय संघाने आशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यात पाकिस्तानला 5 गडी राखून पराभूत करत नवव्यांदा ट्रॉफीवर नावावर कोरले. मात्र सामन्यानंतर ट्रॉफी देण्याच्या समारंभात झालेल्या वादामुळे हा विजय चर्चेचा विषय ठरला आहे. भारतीय संघाने एसीसी आणि पीसीबीचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिल्याने भारतीय संघाला अद्याप ट्रॉफी मिळालेली नाही. यानंतर नक्वी यांनी ट्रॉफी घेऊन मैदानातून पळ काढला, ज्यावरून सध्या वाद निर्माण झाला आहे.
टीम इंडियाने नक्वीकडून ट्रॉफी स्वीकारायला नकार दिल्यानंतर जवळपास तासभर दुबईच्या मैदानात वाद झाला. आशियाई क्रिकेट असोसिएशनच्या अधिकाऱ्यांसह सूर्यकुमार यादवने चर्चा केली, यानंतर टीम इंडियाने एमिरेट्स क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष खालिद अल अरौनी आणि बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष अमिनुल इस्लाम यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्याची तयारी दर्शवली, पण नक्वी यांनी विरोध करत ट्रॉफी आपल्याकडूनच घ्यावी लागेल, असा हट्ट धरला.
ट्रॉफीशिवाय मैदानात टीम इंडियाचं सेलिब्रेशन
टीम इंडियाने मात्र काहीही झालं तरी नक्वीकडून ट्रॉफी स्वीकारणार नसल्याचं स्पष्ट केलं, त्यानंतर नक्वीने आशिया कपची ट्रॉफी मैदानातून बाहेर नेण्याचे आदेश कर्मचाऱ्यांना दिले. मात्र नक्वी यांनी ट्रॉफी दिली नाही, तरी भारताने ट्रॉफीशिवाय मैदानात विजयाचं सेलिब्रेशन केलं. Asia Cup Trophy |
यानंतर आशिया कपच्या ट्रॉफीवरून मोहसिन नक्वी यांच्यावर जगभरातून टीका केली जात आहे. यानंतर नक्वी यांनी आशिया कपची ट्रॉफी भारताला द्यायची तयारी दर्शवली आहे, पण त्यांनी टीम इंडियासमोर एक विचित्र अट ठेवली आहे. टीम इंडियाला ट्रॉफी देण्यासाठी औपचारिक समारंभ आयोजित करण्याची इच्छा मोहसिन नक्वी यांनी बोलून दाखवली आहे. तसेच नक्वी यांनी ही अट आशिया कपच्या आयोजकांना कळवली आहे, पण नक्वीची ही अट मान्य व्हायची शक्यता कमी आहे. Asia Cup Trophy |
तिन्ही वेळा पाकिस्तानचा पराभव
दरम्यान, भारताने आशिया कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध तीन सामने खेळले आणि तिन्ही वेळा पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला. प्रत्येक सामन्यानंतर पाकिस्तानकडून गोंधळ निर्माण करण्यात आला. कधी हँडशेक वाद, कधी ‘प्लेन क्रॅश’ सेलिब्रेशनवरून गोंधळ, तर आता मोहसिन नकवी यांनी ट्रॉफीवरून नवा वाद निर्माण केला आहे. त्यामुळे सध्या आशिया कप 2025 ची फायनल क्रिकेटविश्वात चर्चेचा विषय ठरली आहे. Asia Cup Trophy |
हेही वाचा:





