Eknath Khadse : एकनाथ खडसे घरवापसी करणार? विनोद तावडेंनी घेतलेल्या भेटीमुळे चर्चांना उधाण
Eknath Khadse : लोकसभा निवडणुकीच्या काळात एकनाथ खडसे यांच्या भाजपमध्ये पुनरागमनाच्या चर्चा रंगल्या होत्या.

Eknath Khadse : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या घडामोडींना वेग आला असून आगामी काळात मोठ्या राजकीय बदलांची चर्चा रंगू लागली आहे. अशातच भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि राज्यसभा खासदार विनोद तावडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले असून खडसे घरवापसी करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या काळात एकनाथ खडसे यांच्या भाजपमध्ये पुनरागमनाच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यावेळी दिल्लीतील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत त्यांच्या भेटीचे फोटोही समोर आले होते. मात्र, त्यानंतर महाराष्ट्रातील काही घडामोडींमुळे त्यांची ‘घरवापसी’ पुढे ढकलल्याची चर्चा होती. (Eknath Khadse)
आता विनोद तावडे यांच्या भेटीनंतर खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना बळ मिळाले आहे. उत्तर महाराष्ट्रातील प्रभावी ओबीसी नेता म्हणून ओळख असलेल्या खडसेंना पुन्हा पक्षात आणण्यासाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून हालचाली सुरू असल्याचे बोलले जात आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मते, या संभाव्य हालचालींमागे उत्तर महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे आणि भाजपमधील अंतर्गत रणनीतीही कारणीभूत असू शकते. विशेषतः मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रभावाला पर्याय उभा करण्याच्या दृष्टीनेही या भेटीकडे पाहिले जात असल्याची चर्चा आहे. (Eknath Khadse)

Eknath Khadse : एकनाथ खडसे घरवापसी करणार? विनोद तावडेंनी घेतलेल्या भेटीमुळे चर्चांना उधाण
दरम्यान, एकनाथ खडसे यांनी विनोद तावडे यांच्यासोबतची भेट ही राजकीय नसल्याचे स्पष्ट केले आहे. तरीही या भेटीमुळे त्यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे. सोशल मीडियावर दोन्ही नेत्यांचा भेटीचा फोटो व्हायरल होत आहे. (Eknath Khadse)
खरंतर यापूर्वी अनेकदा एकनाथ खडसे यांच्या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची अनेकदा चर्चा झाली आहे. सध्या ते राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात असले तरी पक्षाच्या सक्रिय राजकारणात त्यांची उपस्थिती मर्यादित असल्याचे चित्र आहे. (Eknath Khadse)
दुसरीकडे, त्यांची कन्या रोहिणी खडसे या राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत, तर त्यांची सून रक्षा खडसे या केंद्रातील मोदी सरकारमध्ये राज्यमंत्री आहेत. त्यामुळे खडसे कुटुंबातील वेगवेगळ्या राजकीय भूमिकांमध्ये एकनाथ खडसे मोठा निर्णय घेणार का अशी कुजबूज जोर धरू लागली आहे.





