Dhamaal 4 Advance Booking : ‘टोटल धमाल’ चा रेकॅार्ड Dhamaal 4 मोडणार? Advance Booking मध्ये झाली इतकी कमाई
Dhamaal 4 Advance Booking : मात्र, हा चित्रपट 'टोटल धमाल'चा बॉक्स ऑफिस विक्रम मोडू शकेल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Dhamaal 4 Advance Booking : बॉलिवूडमधील लोकप्रिय कॉमेडी फ्रँचायझी ‘धमाल’चा चौथा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. इंद्र कुमार यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट १० जुलै २०२६ रोजी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. गेल्या बऱ्याच दिवसांपासून धमाल ४ ची चाहत्यांना मोठी उत्सुकता होती.
दोन दिवसांपूर्वी चित्रपटाची अॅडव्हान्स बुकिंग सुरु करण्यात आली. याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, हा चित्रपट ‘टोटल धमाल’चा बॉक्स ऑफिस विक्रम मोडू शकेल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अॅडव्हान्स बुकिंगला सुरूवात झाल्यानंतर बुकमायशोवर १.२५ लाखांहून अधिक प्रेक्षकांनी चित्रपटात रस दाखवला आहे. गुरुवारी सकाळपर्यंत देशभरातील ७,५८९ शोसाठी ४३,९०७ तिकिटांची विक्री झाली असून, त्यातून सुमारे १.१२ कोटी रुपयांची कमाई झाली आहे. ब्लॉक बुकिंगसह हा आकडा ३.३० कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याची माहिती सॅकनिल्कने दिली आहे.
दिल्ली-एनसीआर, मुंबई आणि पुणे या प्रमुख शहरांमध्ये चित्रपटाला सर्वाधिक प्रतिसाद मिळत आहे. याशिवाय बंगळुरू, हैदराबाद, अहमदाबाद, जयपूर आणि कोलकाता येथेही बुकिंगचा वेग चांगला असल्याचे दिसून येत आहे. मात्र, देशातील अनेक भागांतील मुसळधार पावसाचा थिएटरमधील गर्दीवर काहीसा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा : Janhvi Kapoor: जान्हवीच्या मेहंदीत दिसलं बॉयफ्रेंडचं नाव; चाहते म्हणाले, आता लग्न कधी?
बॉक्स ऑफिसच्या सुरुवातीच्या अंदाजानुसार, ‘धमाल ४’ पहिल्या दिवशी ७ ते ९ कोटी रुपयांची कमाई करू शकतो. चांगला प्रतिसाद मिळाल्यास हा आकडा १० कोटींच्या जवळ पोहोचू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
दरम्यान, ‘धमाल’ फ्रँचायझीचा आतापर्यंतचा ट्रॅक रेकॉर्डही दमदार राहिला आहे. २००७ मधील ‘धमाल’ आणि २०११ मधील ‘डबल धमाल’ हे चित्रपट हिट ठरले होते. तर २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘टोटल धमाल’ने बॉक्स ऑफिसवर १५५.६७ कोटी रुपयांची कमाई करत सुपरहिटचा किताब पटकावला.
आता धमाल ४ हा रेकॅार्ड मोडणार का हे पाहणे महत्वाचे असणार आहे. त्यामुळे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात यावर या गोष्टी अवलंबून असणार आहे. धमाल ४ मध्ये अजय देवगण, रितेश देशमुख, अर्शद वारसी, जावेद जाफरी, संजय मिश्रा आणि रवी किशन प्रमुख भूमिकेत आहेत. संजीदा शेख, ईशा गुप्ता आणि अंजली आनंद यांचीही महत्त्वाची भूमिका आहे.
हेही वाचा : Strait of Hormuz: होर्मुझमध्ये पुन्हा तणाव! पेट्रोल-डिझेल स्वस्त होण्याची आशा मावळली; एलपीजी संकट गडद





