Pune District : संधी मिळाल्यास पीडीसीसी निवडणूक लढणार – किरण आहेर
Pune District : ग्रामीण भागात नवीन शाखा सुरू करण्याचाही विचार असून, सभासदांच्या हिताला प्राधान्य देत त्यांच्या सूचनांचा विचार करून सेवा देण्याचा प्रयत्न केला जाईल.

राजगुरुनगर : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची (पीडीसीसी) निवडणूक स्व. अजितदादा पवार यांच्या पॅनलकडून संधी मिळाल्यास लढविणार असल्याची घोषणा राजगुरुनगर सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष तथा किरण ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष किरण आहेर यांनी केली. पतसंस्थेच्या 31व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते.
राजगुरुनगर येथील किरण ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. यावेळी ज्येष्ठ संचालक अॅड. संदीप भोसले यांनी पतसंस्थेचा विस्तार करण्याची सूचना करत किरण आहेर यांनी पीडीसीसी बँकेची निवडणूक लढवावी, अशी मागणी केली.
आहेर म्हणाले, पतसंस्थेचे भागभांडवल एक कोटीवरून दोन कोटी रुपये करण्याचे उद्दिष्ट आहे. संस्थेसाठी नवीन जागेचा शोध सुरू असून, 58 लाख रुपयांच्या राखीव निधीतून जागा अथवा इमारत खरेदी करण्यासाठी सभासदांची मान्यता घेण्यात येणार आहे. ग्रामीण भागात नवीन शाखा सुरू करण्याचाही विचार असून, सभासदांच्या हिताला प्राधान्य देत त्यांच्या सूचनांचा विचार करून सेवा देण्याचा प्रयत्न केला जाईल.
सभेत सभासदांना देण्यात येणारा 6 टक्के लाभांश राखीव निधीत वर्ग करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. सभेत मांडण्यात आलेले सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले. यावेळी पतसंस्थेचे अध्यक्ष केदार बैरागी, उपाध्यक्ष आनंत भालेकर, संचालक अॅड. संदीप भोसले, संतोष काळे, शरद आल्हाट, राजेंद्र वाळुंज, जितेंद्र सरडे, सुहास दाभाडे, मालन घुमटकर, अनुपमा आहेर, तसेच राजगुरुनगर सहकारी बँकेचे अध्यक्ष अरुण थिगळे, भीमाशंकर देवस्थानचे अध्यक्ष अॅड. सुरेश कौंदरे, रेवण थिगळे, प्रदीप कासवा, भागवत, किशोर कोरे, रवींद्र सातकर, व्यवस्थापक शंकर सावंत, वसुली अधिकारी राहुल पिंगळे यांच्यासह सभासद उपस्थित होते. संतोष काळे यांनी प्रास्ताविक केले, तर जितेंद्र सरडे यांनी आभार मानले.





