Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदे विधानसभेचे रणशिंग फुंकणार? दसरा मेळाव्याला सुरुवात

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची सुरुवात केली होती. बाळासाहेबांनंतर उद्धव ठाकरे यांनी ही परंपरा पुढे सुरु ठेवली. मात्र अडीच वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आणि शिवसेनेमध्ये फूट पडली. त्यानंतर शिंदेची शिवसेना आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना असे दोन गट निर्माण झाले.
यानंतर आता या दोन्ही गटांकडून स्वतंत्रपणे दसरा मेळावा आयोजित केला जातो आहे. महत्त्वाचे म्हणजे यंदा विधानसभा निवडणुका तोंडावर आहे. त्यामुळे या दोन्ही मेळाव्यांकडे राज्याचे लक्ष लागलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा मुंबईतील आझाद मैदानात आयोजित करण्यात आला आहे. तर उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा परंपरेनुसार दादर येथील शिवाजी पार्क मैदानात होणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्याला सुरुवात झाली आहे. प्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते आणि स्वप्नील बांदोडकर यांनी मोरया चित्रपटातील गणपतीचे गाणे गाऊन या मेळाव्याला सुरुवात केली आहे. या मेळाव्याला कार्यकर्ते जमायला सुरुवात झाली आहे. या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय घोषणा करतात ? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.





