सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणी मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग आणणार : नाना पटोले

मुंबई : परभणीतील हिंसाचार प्रकरणी काँग्रेस पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूप्रकरणी विधानसभा सभागृहात खोटी माहिती दिल्यामुळे काँग्रेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात हक्कभंग आणणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. सूर्यवंशी यांचा मृत्यू दम्याच्या आजाराने झाला, अशी खोटी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी नागपूर अधिवेशनात देऊन सभागृहाची दिशाभूल केली. त्यांच्याविरोधात आम्ही हक्कभंग आणणार आहोत, असे पटोले म्हणाले. ते दिल्ली येथे माध्यमांशी बोलत होते.
सोमनाथ सूर्यवंशी या निरपराध सुशिक्षित तरुणाचा मृत्यू पोलिस मारहाणीमुळेच झाल्याची पुष्टी शवविच्छेदन अहवालाने केली असताना राज्य सरकार अद्याप संबंधित पोलिसांना पाठीशी घालत आहे, असा आरोप नाना पटोले यांनी केला. परभणी येथील सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मृत्यूला पोलिस जबाबदार नाहीत, तर मग सरकार त्यांना निलंबित का करत आहे? असा सवाल करत सरकारने संबंधितांना बडतर्फ करावे, असेही ते म्हणाले.
कोम्बिंग ऑपरेशनचे आदेश कोणी दिले?
परभणी व बीड प्रकरणी पोलिसांच्या मदतीने लोकांचे जीव घेतले गेले. परभणीतील आंबेडकरी अनुयायी सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या पोलिसांच्या मारहाणीमुळेच झाल्याचे स्पष्ट झालेले आहे. सरकारने अजून त्या पोलिसांवर कठोर कारवाई केलेली नाही. संविधानाच्या विटंबनेनंतर परभणीत कोम्बिंग ऑपरेशन करून निरपराध लोकांना बेदम मारहाण करण्यात आली. या कोम्बिंग ऑपरेशनचे आदेश कोणी दिले? मंत्रालय व पोलिस महासंचालक कार्यालयातून आदेश दिले गेले का? असा सवाल करत याची चौकशी करून कोम्बिंग ऑपरेशन करणारे अधिकारी व त्यांना आदेश देणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पटोलेंनी केली.





