पुणे जिल्हा | आळंदीतील भाजपचे पदाधिकारी तुतारी फुकणार?

आळंदी, (वार्ताहर) – महाराष्ट्रात विधानसभा निवडणूका लवकरच होणार असून खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघात सुद्धा निवडणुकीचे वातावरण तापले आहे.
या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) दिलीप मोहीते पाटील आमदार असुन हा मतदारसंघ महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसकडेच राहणार असून त्यामुळे सत्तेतील भाजपचे माजी तालुकाध्यक्ष अतुल देशमुख यांनी लोकसभेपूर्वीच शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला असून येणार्या निवडणुकीत ते पवार गटाकडून इच्छुक आहेत.
अतुल देशमुख यांचा आळंदी शहरात चांगला प्रभाव असून अनेक भाजपचे पदाधिकारी व माजी नगरसेवक त्यांच्या कायम संपर्कात असतात त्यामुळे ते अगामी विधानसभेत अतुल देशमुख यांच्या प्रेमापोटी तुतारी वाजवतील, असे बोलले जात आहे.
अतुल देशमुख यांच्या नेतृत्वाखाली 2016च्या आळंदी नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजपची सत्ता आली. त्यामुळे त्यांचा शब्द पक्षाच्या नगरसेवकांनी कधीही खाली पडू दिला नाही. ते म्हणतील तसेच काम पक्षाचे पदाधिकारी व नगरसेवक करत होते.
पण अजित पवार हे सत्तेत सहभागी झाल्याने महायुतीत खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघ भाजपला मिळण्याची शक्यता तशी कमीच असल्याने केवळ आमदाराकीच्या इच्छेसाठी त्यांनी तुतारी तर हाती घेतली नाही ना असा सवाल ही उपस्थित होत असून आगामी काळात जर आळंदीतील पदाधिकार्यांनी जर तुतारी फुंकली तर नवल वाटायला नको. मात्र, तोपर्यंत राजकीय धुळवड याच पद्धतीने उडत राहिल यात काही प्रश्न नाही हे मात्र नक्की!
डाळ शिजणार, माघार की अपक्ष?
अतुल देशमुख हे भाजपकडून विधानसभेच्या तयारीत होते. राज्यातील सत्ता नाट्यामुळे खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघ भाजपला मिळू शकणार नाही.
त्यामुळेच त्यांनी शरद पवार यांच्या उपस्थिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात लोकसभेपूर्वीच प्रवेश केला असला तरी महाविकास आघाडीत या जागेसाठी ठाकरे गट आग्रही असल्याने अतुल देशमुख यांची डाळ शिजणार की ते माघार घेणार की अपक्ष उभे ठाकणार हे पाहणे औत्सुक्याचे आहे.




