पुणे जिल्हा | सर्व पक्षीय आघाडीत खीळ पडू देवू नका

राजगुरूनगर, (प्रतिनिधी) – खेड-आळंदी विधानसभेत सर्व पक्षीय आघाडीत खीळ पडणार नाही. याची काळजी घ्या. पूर्ण ताकदीने बाबाजी काळे यांच्या मागे उभे राहा, असे आवाहन शिवसेना नेते सचिन अहिर यांनी केले. महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार बाबाजी काळे यांनी उमेदवारी अर्ज मंगळवारी (दि.29) भरला.
यावेळी ठाकरे गटाचे उपनेते रवींद्र मिर्लेकर, पुणे जिल्हा महिला आघाडीच्या विजया शिंदे, तालुका प्रमुख रामदास धनवटे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष तालुका अध्यक्ष हिरामण सातकर उपस्थित होते. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर खेड बाजार समितीच्या मैदानात झालेल्या सभेत शिवसेनेचे नेते सचिन अहिर बोलत होते.
यावेळी पवार गटाचे जिल्हा अध्यक्ष जगन्नाथ शेवाळे, प्रदेश महिला उपाध्यक्षा राजमाला बुट्टे पाटील,जिल्हा प्रमुख अशोक खांडेभराड, देवेंद्र बुट्टे पाटील, नानासाहेब टाकळकर,सुरेश चव्हाण, संजय घनवट, अमोल पवार, ज्योती अरगडे, मृगेश काळे, प्रमोद गोतारणे, विजय शिंदे, सुदाम कराळे यांच्यासह महाविकास आघाडीतील तालुक्यातील नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रवींद्र मिर्लेकर म्हणाले की, तालुक्यातील जनतेच्या व्यथा जाणणारा उमेदवार बाबाजी काळे आहे. उद्धव ठाकरे यांनी उमेदवार देण्यासाठी जास्त दिवस घेतले पण जनतेच्या मनातला उमेदवार तुम्हाला दिला आहे.
खेड तालुक्यातील पूर्व-पश्चिम भागातील प्रश्न, तीन शहरांचे प्रलंबित प्रश्न अद्यापही सुटले नाहीत एमआयडीसी रस्ते खराब झाले आहेत. तालुक्यातील युवा वर्गाला न्याय मिळाला नाही, महिलांना न्याय मिळाला नाही आदिवासी भागातील नागरिकांना रोजगार नाही. हे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी जनतेने मला साथ द्यावी. – बाबाजी काळे, उमदेवार, महाविकास आघाडी (खेड-आळंदी)





