Bharatshet Gogawale : “बॅगेतून आता चार कोट आणले आहेत”, भरत गोगावलेंचे ‘ते’ वक्तव्य चर्चेत

मुंबई : राज्यात शिंदे फडणवीस सरकारच्या स्थापनेनंतर भरत गोगावले यांचा मंत्रिमंडळात समावेश केला जाईल अशी अपेक्षा होती. पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना वेटिंग लिस्टवर ठेवण्यात आले. दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारातही त्यांना स्थान मिळेल अशी अपेक्षा होती.
मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या नऊ मंत्र्यांना संधी दिल्याने गोगावलेंना पुन्हा वेटिंग लिस्टवर राहावे लागले. लवकरच माझा मंत्रिमंडळात समावेश केला जाईल असा आशावाद ते सतत व्यक्त करत राहीले. मात्र शेवटपर्यंत गोगावले यांची मंत्री पदावर वर्णी लागली नाही.
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला जनतेने बहुमत दिले आहे. या निवडणुकीत महाड विधानसभा मतदारसंघातून भरत गोगावले १ लाख १७ हजार ४४२ मतांनी विजयी झाले. तर, त्यांच्याविरोधात असलेल्या शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाच्या स्नेहल जगताप २६ हजार मतांनी पराभूत झाल्या. शिवसेनेत फूट पडल्यापासून भरत गोगावलेंनी शिवसेनेची सातत्याने बाजू सांभाळली.
भरत गोगावलेंचे ‘ते’ वक्तव्य चर्चेत
मंत्रिपदाच्या प्रश्नावर भरत गोगावले म्हणाले, मी २६ हजारांनी मी निवडून आलो आहे. टीका टिप्पणी करणाऱ्यांनीही आम्हाला मते दिलीत. फुल्ल स्वींगमध्ये आम्ही आहोत. तिन्ही पक्षाचे चांगले आमदार निवडून आले आहेत. काळजी करण्याचं कारण नाही.
मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी कोट शिवून ठेवलाय का असा प्रश्न त्यांना विचारला असता ते म्हणाले, “आताही बॅगेत कोट आणले आहेत. चार कोट आणले आहेत. हवंतर तुम्हाला दाखवतो. काळजी करण्याचं कारण नाही. कोटावर कोणी जाऊ नका, ओठावर जा.” असे भरत गोगावले म्हणाले. त्यांच्या या विधानाची पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.





