Pune District : भविष्यात सर्व घटकांसाठी कटिबद्ध राहू

बारामती : बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती ही भविष्यातही शेतकरी, आडते, खरेदीदार, हमाल-मापाडी व श्रमजीवी घटकांसाठी संस्था सतत कटिबद्ध आहे. राहील आणि शेतकरी हिताचे काम करीत राहू, असे मत सभापती सुनील पवार यांनी व्यक्त केले. बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचा ८९ वा वर्धापन दिन किरण तावरे, बाळासाहेब गवारे यांच्या हस्ते उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी बाजार समितीचे सभापती, संचालक व सचिव, व्यापारी वर्ग आणि सेवकांच्या उपस्थितीत गणपती आरती घेऊन केक कापण्यात आला. बारामती बाजार समितीची स्थापना दि. १६ डिसेंबर १९३५ रोजी झाली.
सुनील पवार म्हणाले की, संस्थेचे कामकाज पारदर्शक असून शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. संस्थेवर मला एका शेतकरी कुटुंबातील व्यक्ती असून ही सभापती म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे. बारामती मुख्य आवार तसेच जळोची व सुपे उपबाजार आवारात संस्थेने विविध सुविधा पुरविलेल्या असून त्याचा फायदा शेतमाल खरेदी विक्रीसाठी होत आहे.
नवीन उपबाजारासाठी सुपे व झारगडवाडी येथे समितीने खरेदी केलेल्या जागेत भविष्यात शेतमाल खरेदी विक्रीची सुविधा निर्माण करणयाचा समितीचा मानस आहे. समितीने आवारात आधुनिक धान्य ग्रेडींग युनिट, गांडूळ खत प्रकल्प, गोदाम, रेशीम कोष मार्केट, ई-नाम प्रणाली, इलेक्ट्रॉनिक भुईकाटा, गूळ सेलहॉल, फळे व भाजीपाला विक्री करिता सेलहॉल, जनावरे बाजार, आंबा निर्यात सुविधा केंद्र, पेट्रोल पंप इत्यादी सुविधा उभारलेल्या असल्याने बाजार समितीस गुणांकन पद्धतीत राज्यात प्रथम क्रमांक मिळाला.
यावेळी बारामती मर्चन्ट असोसिएशनचे अध्यक्ष संभाजी किर्वे, इतर व्यापारी, आडते, हमाल मापाडी, समितीचे संचालक बापुराव कोकरे, सतीश जगताप, विनायक गावडे, दत्तात्रय तावरे, शुभम ठोंबरे, संतोष आटोळे उपस्थित होते. समितीचे सचिव अरविंद जगताप यांनी आभार मानले.
सात टनांच्या कोल्ड स्टोरेजची सुविधा
सभापती पवार म्हणाले की, बाजार समितीने जळोची उपबाजार येथे मॅग्नेट प्रकल्पांतर्गत फळे व भाजीपाला हाताळणी केंद्राची उभारणी केली आहे. प्रति १०० मे. टनाचे सात कोल्ड स्टोरेज, प्रति १० टनाचे तीन प्रिकुलींग युनिट, ब्लास्ट फ्रिजर, फ्रोजन फ्रुट, पॅक हाऊस, डिसपॅच एरिया, केळी ग्रेडींग, डाळींबाची ज्युस लाइन व एरीयल लाइन आदी सुविधा उपलब्ध आहेत. अशा सुविधा पुरविण्याचा संस्थेचा सतत प्रयत्न असून भविष्यात ही समिती शेतकरी हिताचे काम करण्यास कटिबद्ध राहील.





