देवेंद्र फडणवीसांना ‘मी पुन्हा येईन’ पुस्तक लिहायला सांगणार; अजित पवारांची मिश्किल टिप्पणी

पुणे : मुंबईला गेल्यावर ज्याक्षणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट होईल त्याच वेळी आपण त्यांना ‘तुम्ही एक पुस्तक लिहिले आहे, आता तुम्ही दुसरे पुस्तक लिहा आणि त्याचे नाव ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन’ असे द्या, असा सल्ला देणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते.
अजित पवार म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘अर्थसंकल्प कसा समजून घ्यावा’ असं विरोधी पक्षनेते असताना एक पुस्तक लिहिले आहे. त्यामुळे त्यांना पुस्तक लिखाणाचा अनुभव आहे. त्यामुळे आपण आता त्यांना विनंती करणार आहे की, तुम्ही दुसरे पुस्तक लिहा, त्याचे नाव ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन’ असे द्या. च्या या विधानानंतर सभागृहात एकच हशा पिकला. राज्याला राजकारणाचा सुसंस्कृतपणा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्यामुळे लाभला आहे, असंही अजित पवार यावेळी म्हणाले.
देवेंद्र फडणवीसांकडून अनेकदा ‘मी पुन्हा येईनचा उल्लेख’
दरम्यान, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपा हा सर्वात मोठा पक्ष म्हणून नावारुपाला आला होता. मात्र, सर्वांत मोठा पक्ष असूनही भाजपाला सत्ता स्थापन करता आली नव्हती. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोबत घेऊन महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले होते. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना विरोधी बाकावर बसावे लागले होते. याच काळात विरोधी पक्षात असताना त्यांनी विधिमंडळात भाषण करताना, वेगवेगळ्या कार्यक्रमांत तसेच निवडणुकीत प्रचार करताना ‘मी पुन्हा येईन’ हे विधान अनेकदा केले होते. त्यांचे हे विधान त्यावेळी चांगलेच चर्चेत आले होते.





