अरूणाचलचे मुख्यमंत्री पेमा खांडू येणार अडचणीत? सर्वोच्च न्यायालयाने आरोपांची घेतली दखल

नवी दिल्ली – अरूणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्यावर कुटूंबातील सदस्यांना सरकारी कंत्राटे दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यासंदर्भातील याचिकेची सर्वोच्च न्यायालयाने दखल घेतली. त्यामुळे भाजपचे नेते असणारे खांडू अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
खांडू यांच्या विरोधात दोन बिगरसरकारी संस्थांनी याचिका दाखल केली आहे. त्या याचिकेची छाननी करण्याची तयारी न्यायालयाने दर्शवली. तसेच, अरूणाचल आणि केंद्र सरकारांकडून उत्तर मागवले.
नियंत्रक आणि महालेखा परीक्षकांकडूनही उत्तर मागवण्यात आले आहे. त्यासाठी ५ आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे. न्यायालयाने अरूणाचल सरकारकडून लाभार्थींची माहिती मागवली आहे.
तसेच, कंत्राटे देताना योग्य प्रक्रियेचे पालन झाले का, अशी विचारणाही केली आहे. प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसारखा अरूणाचलचा कारभार चालवला जात आहे.
ती स्थिती अतिशय धक्कादायक आहे, असा युक्तिवाद सुनावणीवेळी याचिकाकर्त्यांचे वकील प्रशांत भुषण यांनी केला. संबंधित प्रकरणाची पुढील सुनावणी जुलैमध्ये होण्याची शक्यता आहे.





