वैकुंठात अंत्यसंस्कार करू देणार; परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत इतर विधी नाहीत

पुणे – करोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा परिणाम अंत्यसंस्कारावरही झाला असून, वैकुंठात अंत्यविधी करण्याचा प्रश्न नाही; परंतु तेथील गुरुजींनी सद्य परिस्थितीत दशक्रिया विधी करण्याला किमान 31 मार्चपर्यंत असमर्थता व्यक्त केली आहे.
नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी पार्थिवाला भडाग्नी द्यावा लागू नये यासाठी अंत्यविधी करण्याला प्रशांत मोघे गुरुजी यांनी सहमती दर्शविली असून ते विधी करत आहेत. मात्र, प्रशांत मोघे गुरुजी रात्री 9 ते सकाळी 9 या वेळेत उपलब्ध नसतील याची नोंद घ्यावी, असेही त्यांनी कळवले आहे.
या कालावधीत अंत्यसंस्कार करू इच्छिणाऱ्यांनी भडाग्नी द्यावा व अस्थी पूजन करण्याचा पर्याय ही प्रशांत गुरुजींनी दिला आहे. तसेच ज्यांना दशक्रिया आणि तत्सम विधी करावयाचा आहे त्यांच्यासाठी प्रशांत मोघे गुरुजींनी व्हिडीओ कॉलवर विधी करण्याचा पर्याय ही उपलब्ध करून दिला आहे.
हे कार्य करणाऱ्या गुरुजींना तसेच ज्ञान प्रबोधिनी पद्धतीने अंत्यविधी करण्यास तयार असणाऱ्या गुरुजींना लॉकडॉऊन काळात विधी करण्यासाठी वैकुंठ वा अन्यत्र जाण्यासाठी महापालिकेने पासची व्यवस्था केली आहे. आता प्रशासनाने दशक्रिया आणि अन्य विधी बाबत ओंकारेश्वर, संगम घाट वा अन्य ठिकाणी कोरोनापासून बचावाची पूर्ण व्यवस्था करून 3 ते 4 नातेवाईकांच्या उपस्थितीत सुरक्षित अंतर ठेवून विधी करण्यास परवानगी देता येईल, का हे पहावे लागणार आहे. नसेल तर तसे आवाहन करणारे फलक महापालिकेने सर्व स्मशानभूमीत लावावेत अशी विनंती काही कार्यकर्त्यांनी महापालिकेकडे केली आहे.
अंत्यविधी नंतरचे कर्म आणि श्राद्ध नंतर करता येते असे “दाते पंचाग’ चे मोहन दाते यांनी सांगितले आहे. सध्याचे वातावरण निवळल्यावर कोणतेही चार दिवस ठरवून 10 ते 14 दिवसांचे कर्म अंतरीत म्हणून करता येते. अन्य विधींबाबतही गुरुजींनी तोडगा सांगितला आहे. तसेच, नागरिकांच्या सोयीसाठी ज्ञान प्रबोधिनीने श्राद्धविधीसाठी ऑनलाइनचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. मात्र, दाहकर्मासाठी ज्ञान प्रबोधिनीच्या वेबसाईटवर जाऊन सुलभ पद्धतीने कुटुंबातील व्यक्तीनेच वाचन आणि क्रिया करून अंत्यविधी पार पाडण्याचा पर्याय ही खुला ठेवण्यात आला आहे.





