मुंबई – छोट्या पडद्यावरील अभिनेत्री दीपिका कक्कर आणि तिचा पती शोएब इब्राहिम लवकरच आई-बाबा होणार आहेत. मात्र आई झाल्यानंतर दीपिका अभिनय क्षेत्र सोडणार असल्याची चर्चा रंगली आहे. यामुळे तिचा चाहता वर्ग नाराज झाला होता. परंतु ही अफवा असल्याचे स्पष्टीकरण दीपिकाने दिले आहे.
एका मुलाखतीमध्ये दीपिकाने गृहिणी आणि आई म्हणून जगण्याची इच्छा व्यक्त केली होती. यावरून अनेकांनी ती अभिनय क्षेत्राला कायमचा रामराम करणार असल्याचा समज करून घेतला. याबाबत तिने संगितले की, “लोकांनी माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ लावला आहे. मी बाळाला वेळ देण्यासाठी काही वर्षे नक्कीच ब्रेक घेऊ शकते. वर्षानुवर्षे मालिकांमध्ये काम केल्यानंतर मला गृहिणीच्या जीवनाचा आनंद घ्यायचा आहे. पण याचा अर्थ मी अभिनय सोडला असा होत नाही.”
पुढे ती म्हणाली, “मला नेहमीच गृहिणी व्हायचं होतं, पण याचा अर्थ असा नाही की मला पुन्हा काम करायचे नाही. पुढील 4 ते 5 वर्षे मला काम करता येणार नाही. कारण तो वेळ मला माझ्या बाळाला द्यायचा आहे. पण त्या दरम्यान मला काही चांगली ऑफर आली तर मी ते स्वीकारेन अशी शक्यता आहे.” ज्या महिला मातृत्व, काम आणि घर एकत्र सांभाळतात त्यांच्याबद्दल खूप आदर असल्याचे देखील यावेळी दीपिका म्हणाली.
दरम्यान, दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम यांचा विवाह 2018 मध्ये झाला होता. ‘ससुराल सिमर का’ या शोच्या सेटवर दोघेही प्रेमात पडले होते. यानंतर त्यांनी एकत्र आयुष्य घालवण्याचा निर्णय घेतला, अभिनेत्रीचे हे दुसरे लग्न आहे. तिचे पहिले लग्न रौनक सॅमसन या पायलटशी झाले होते. ती सलमान खानच्या रिअॅलिटी शो बिग बॉस 12 ची विजेती आहे.