Ladaki Bahin Yojana : ‘या’ लाडक्या बहिणींवर कारवाई होणार? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टचं सांगितलं

Ladaki Bahin Yojana : महाराष्ट्र सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ अंतर्गत अपात्र महिलांनी लाभ घेतल्याचे उघडकीस आले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र नसलेल्या २,६५२ महिला सरकारी कर्मचाऱ्यांनी लाभ घेतल्याचे तपासणीतून समोर आले आहे. यामुळे राज्य सरकारने या अपात्र लाभार्थ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिर येथे पुस्तक प्रकाशन कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते. याप्रसंगी ते पत्रकारांशी बोलत होते.
वैष्णवी आत्महत्या प्रकरणातील आरोपीला सोडणार नाही
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील कोणत्याही आरोपीला सोडले जाणार नाही. कोणत्याही प्रकारची हयगय सहन केली जाणार नाही. निलेश चव्हाण याच्याबाबत पोलिसांनी अतिशय चांगली कारवाई केलेली आहे. त्याचा नेपाळमध्ये पळून जाण्याचा प्रयत्न होता. त्याला भारत-नेपाळ सीमेवर पकडले आहे. योग्य प्रकारची माहिती प्राप्त करून त्याबाबतचा सापळा पोलिसांनी लावला, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
जालिंदर सुपेकर यांचे अधिकार काढून घेतले
पुढे बोलताना म्हणाले, या प्रकरणामध्ये आरोपींना अतिशय कडक शिक्षा झाली पाहिजे, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. तपासामध्ये कोणीही काहीही गडबड करू नये. त्यासाठी आम्ही त्याचा आढावा घेत आहोत. जालिंदर सुपेकर यांच्यावर आरोप होत आहेत, जे शस्त्र परवाने दिले गेले आहेत, त्याबाबतचे अधिकार काढून घेतले आहे, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता त्याविषयी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, याबाबत तक्रार आलेली आहे.
त्याविषयी करण्यात येणाऱ्या तक्रारीमध्ये किती तथ्य आहे, हे पाहण्यास मी सांगितलेले आहे. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाच्या तपासामध्ये कोणीही दबाव आणू नये, या दृष्टीने आम्ही निर्णय घेतलेले आहेत. त्याचप्रमाणे शस्त्राच्या ज्या परवानग्या दिल्या आहेत, त्याचा निश्चितपणे आढावा घेण्यात येणार आहे. कोणतीही चुकीची परवानगी दिली असेल तर ती रद्द केली जाईल, असंही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.





