Ramesh Chennithala : काँग्रेसमधील मोठं नाव राहुल गांधींची साथ सोडणार? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Ramesh Chennithala : अखेर काँग्रेसने केरळच्या मुख्यमंत्रीपदासाठी व्ही. डी. सतीशन यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला.

Ramesh Chennithala : केरळमध्ये मुख्यमंत्रिपदाची संधी हुकल्याने नाराज झालेल्या काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष रमेश चेन्निथला राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा केरळच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.
केरळ राज्यात काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदावरुन बराच खल सुरू होता. तीन नेत्यांची नावे मुख्यमंत्री पदासाठी आघाडीवर होते. रमेश चेन्निथला यांचे देखील आघाडीवर होते.
अखेर काँग्रेसने केरळच्या मुख्यमंत्रीपदासाठी व्ही. डी. सतीशन यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला. काँग्रेस नेतृत्वाने आणि यूडीएफ आघाडीने त्यांची मुख्यमंत्री म्हणून निवड जाहीर केली असून ते १८ मे रोजी शपथ घेणार आहेत.
या निवडीनंतर संयुक्त लोकशाही आघाडीच्या (यूडीएफ) बैठकीला अनुपस्थित राहून रमेश चेन्निथला आपला निषेध व्यक्त केला असल्याची माहिती मिळत आहे. त्यांनी राहुल गांधी यांच्याकडे नाराजी व्यक्त केली असून आमदारकीचा राजीनामा देण्याची तयारीही दर्शविल्याची माहिती आहे.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह पक्षातील वरिष्ठ नेते त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत असून, रविवारी (ता.१७) याबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.
अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या सरचिटणीस दीपादास मुन्शी आणि इतर वरिष्ठ नेत्यांनी चेन्निथला यांना मंत्रिमंडळात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
२० आमदार मंत्री पदाची शपथ घेणार?
व्ही. डी. सतीशन सरकारचा शपथविधी सोमवारी (ता.१८) होणार असून, २० सदस्यीय मंत्रिमंडळातील खातेवाटपावर उद्या (ता.१६) यूडीएफ नेत्यांची पुन्हा बैठक होणार आहे. त्यामुळे २० आमदार मंत्री पदाची शपथ घेणार असल्याचे सांगितले जात आहे.
काँग्रेसमध्ये सतीशन आणि चेन्निथला गटांमधील अंतर्गत संघर्ष तीव्र झाला असला तरी मुस्लिम लीग, केरळ काँग्रेस आणि आरएसपी या मित्रपक्षांनी सतीशन यांच्या नेतृत्वाला पाठिंबा दिला आहे.
कोण आहेत रमेश चेन्निथला?
रमेश चेन्निथला हे केरळमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असून राज्याच्या राजकारणातील प्रभावशाली व्यक्तिमत्त्व मानले जातात. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष (KPCC अध्यक्ष) राहिले आहेत.
त्यांनी केरळ विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणूनही काम केले आहे. तसेच उमन चांडी सरकारमध्ये गृहमंत्री पदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली होती. काँग्रेस संघटनेत युवक काँग्रेसपासून त्यांनी राजकीय प्रवास सुरू केला आणि अखिल भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्षही राहिले आहेत.
रमेश चेन्निथला हे त्यांच्या आक्रमक भाषणशैली, संघटन कौशल्य आणि काँग्रेसमधील गटबाजीतील प्रभावामुळे ओळखले जातात. केरळ काँग्रेसमध्ये त्यांचा स्वतंत्र समर्थक गट मानला जातो.
सध्या केरळमध्ये व्ही. डी. सतीशन यांना मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाल्यानंतर चेन्निथला नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
हेही वाचा : Vicky Kaushal: ‘तुझ्यासारखा मुलगा मिळणं माझं भाग्य’; विकी कौशलच्या वाढदिवशी वडील शाम कौशल भावूक






