भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी नव्या चेहऱ्याला मिळणार संधी? मोहोळांनी स्वत: केला खुलासा

Maharashtra politics | राज्यात विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता महायुतीकडून मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू आहे. यासाठी दिल्लीत वरिष्ठ नेतेमंडळीसोबत बैठका देखील घेतल्या जात आहे. मुख्यमंत्री पदावरून एकनाथ शिंदे यांनी माघार घेत असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले. त्यानंतर मुख्यमंत्री भाजपचा होणार हे जवळपास निश्चीत झाले आहे.
यादरम्यान पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याही नावाची मुख्यमंत्री पदासाठी चर्चा सुरू झाली आहे. मात्र मोहोळ यांनी एक्स’वरील पोस्टमधून याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
मुख्यमंत्रिपदाच्या चर्चेविषयी मुरलीधर मोहोळ म्हणाले की, “समाजमाध्यमांमधून माझ्या नावाची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी होणारी चर्चा निर्थरक आणि कपोलकल्पित आहे. आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून लढताना महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आमचे नेते मा. देवेंद्रजींच्या नेतृत्वात लढलो. महाराष्ट्राच्या जनतेने कौलही ऐतिहासिक दिला आहे.”
पुढे ते म्हणाले, “आमच्या भारतीय जनता पार्टीत पक्षशिस्त आणि पार्टीचा निर्णय सर्वोच्च असतो. असे निर्णय पार्लामेंट्री बोर्डात एकमताने घेतले जातात, ना की सोशल मीडियाच्या चर्चेवर! आणि पार्लामेंट्री बोर्डात एकदा का निर्णय झाला, तर पार्टीचा निर्णय आमच्यासाठी सर्वोच्च असतो. म्हणूनच माझ्या नावाची सोशल मीडियात होणारी चर्चा अर्थहीन आहे,” असा खुलासा मोहोळ यांनी केला आहे. दरम्यान, मुरलीधर मोहोळ यांनी याद्वारे अप्रत्यक्षरित्या देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्रिपदाचे दावेदार असल्याचं सांगितल्याचे दिसत आहे.
मोहोळ यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी का आले चर्चेत?
पुण्याचे असलेले मुरलीधर मोहोळ हे मराठा समाजातील असून ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघांशी संबंधित आहे. भाजपचा हिंदुत्ववादी चेहरा अशी त्यांची ओळख आहे. यंदा पहिल्यांदाच खासदार झालेल्या मोहोळ यांना केंद्रीय मंत्रिमंडळातही स्थान देण्यात आले आहे. तसेच नवा चेहरा म्हणून मोहोळ यांच्या नावाची मुख्यमंत्रिपदासाठी चर्चा सुरू झाली होती. परंतु या सर्व चर्चांना त्यांनी पूर्णविराम दिला आहे.
देवेंद्र फडणवीसांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी जवळपास निश्चित
महायुतीचा शपथविधी सोहळा पाच डिसेंबरला मुंबईच्या आझाद मैदानावर होणार आणि देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असतील, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. अमित शाह यांच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती मिळत आहे. मात्र अद्याप भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
हेही वाचा:





