कराड : माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी महिनाभरात मराठी माणूस देशाचा पंतप्रधान होण्याची शक्यता असल्याचं सूचक विधान करून महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी राजीनामा देणार का, अशा चर्चांना उधाण आलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये प्रचाराचा अंतिम दिवशी चव्हाण यांनी कराड येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगावर टीका केली. “निवडणूक आयोगाने सगळा गोंधळ घालून ठेवला आहे, याला राज्य सरकार जबाबदार आहे,” असा आरोप त्यांनी केला. दरम्यान, याच पत्रकार परिषदेत आंतरराष्ट्रीय राजकारणावर भाष्य करताना त्यांनी हा मोठा दावा केला. चव्हाण यांनी ‘एपस्टाईन फाईल्स’चा (Epstein Files) संदर्भ दिला. अमेरिकेत गेल्या सहा महिन्यांपासून उद्योगपती जेफ्री अॅमस्टिन (Jeffrey Epstein) यांच्या फाईल्सवरून मोठा गदारोळ सुरू आहे. या फाईल्समध्ये राजकीय नेत्यांचा सहभाग असल्याचं उघड झाल्यावर अमेरिकेप्रमाणेच भारताच्या राजकारणावरही त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो, असं मत त्यांनी व्यक्त केलं. “कदाचित महिनाभरात मराठी माणूस देशाचा पंतप्रधान होऊ शकतो,” असे खळबळजनक वक्तव्य चव्हाण यांनी केले. याबद्दल अधिक बोलताना त्यांनी स्पष्टीकरण दिले, “मी फक्त म्हटलं मराठी माणूस पंतप्रधान होण्याची शक्यता आहे, त्यातून काय अर्थ काढायचा तो काढा.” राज्यातील नगरपालिका निवडणुका पुढे ढकलण्यावरूनही चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जबाबदारी ढकलली. “राज्यात गेली पाच वर्ष नोकरशाहीचे राज्य असून या गोंधळाला सरकारच जबाबदार आहे,” असे ते म्हणाले.