नागपूर: महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी युतीचे स्पष्ट संकेत दिल्याने राज्यभरातील शिवसैनिक आणि मनसैनिकांमध्ये उत्साह आहे. “महाराष्ट्राच्या मनात जे आहे, तेच होईल,” असे उद्धव ठाकरे म्हणाले. यामुळे ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याची शक्यता वाढली असून, यामुळे इतर पक्षांना आव्हान निर्माण होऊ शकते. शिवसैनिक आणि मनसैनिकांनी “ठाकरे ब्रँडची ताकद महाराष्ट्राला दिसेल,” अशी भावना व्यक्त केली. या चर्चांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले, “यावर राज ठाकरे प्रतिक्रिया देतील, माझा यात काय संबंध? माध्यमे जास्त तर्क लढवतात, पण मला यावर बोलण्याची गरज वाटत नाही.” त्यांनी राजकीय अनुभव उचित वेळी बोलतो, असेही नमूद केले. दुसरीकडे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हात जोडत, “महायुती मजबुतीने लढेल आणि जिंकेल,” असे सांगितले. कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी, “मनसे-शिवसेना युती झाली तरी लोक विकास आणि नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व पाहतात. लोक आमच्यासोबत आहेत,” असे सांगत युतीचा परिणाम कमी होईल, असा दावा केला. दरम्यान, गडचिरोलीत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते C-60 पोलिस युनिटला रशियन बनावटीच्या 172 असॉल्ट रायफल्स, 19 मशीन पिस्टल्स आणि 300 भारतीय बुलेटप्रूफ जॅकेट्स प्रदान करण्यात आले. यामुळे C-60 ची मारक क्षमता वाढणार असून, जंगलातील ऑपरेशन्स अधिक अचूक होतील, अशी अपेक्षा आहे.