Wild Animal Attack : बिबट्या की आणखी कोणी? ५ वर्षांच्या चिमुकल्याला ओढत नेणारा ‘तो’ हिंस्त्र प्राणी कोणता? भोर हादरलं
Wild Animal Attack : खेळता खेळता काळाने घातला घाला; १ किलोमीटर फरफटत नेल्याने चिमुकला गंभीर जखमी, उपचारापूर्वीच प्राणज्योत मालवली.

Wild Animal Attack – केंजळ (ता.भोर) येथे ऊस तोडणी करत असताना कामगाराच्या ५ वर्षीय चिमुकल्याला ऊस शेतीच्या पाठीमागील बाजूस खेळत असताना अचानक वन्य प्राण्याने हल्ला करून अंदाजे १ किलोमीटर अंतरापर्यंत फरफडत नेले. या घटनेत तो गंभीर जखमी झाला असल्याने उपचारापूर्वीच त्याला आपला जीव गमवावा लागला. ही घटना सुमारे साडेनऊच्या सुमारास घडली.
सकाळच्या सुमारास काही वेळाने शेतात काम करणाऱ्या त्याच्या पालकांच्या लक्षात आल्यावर चिमुकला गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्याचा शोधाशोध घेतला असता १ किलोमीटर अंतरावर गंभीर जखमी अवस्थेत त्याचा शोध लागला. मात्र, या दुर्दैवी घटनेत गंभीर जखमी झाल्यामुळे कृष्णा किरण सोनवणे (वय- ५, रा. पिंपरखेड ता.चाळीसगाव) याचा मृत्यू झाला.
नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा किरण सोनवणे याचे आई-वडील तसेच इतर कामगार केंजळ येथील शिवारात ऊस तोडणी करीत होते. यावेळी कृष्णा ऊस शेताच्या पाठीमागील बाजूस खेळत होता. काही वेळाने कृष्णा दिसेनासा झाल्यामुळे त्याची शोधाशोध करण्यात आली. बराच वेळ कृष्णाची शोधाशोध करूनही कृष्णा सापडला नसल्याने नातेवाईक तसेच आई-वडिलांनी परिसरात आजूबाजूला पाहिले असता कृष्णा गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला.
वन्य प्राणी कोण?
कृष्णाला वन्यप्राण्याने पळवून नेऊन गंभीर जखमी केले असल्याचे नातेवाईकांच्या लक्षात आले असता तात्काळ नातेवाईकांनी चिमुकल्याला भोर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच कृष्णाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.
कृष्णाच्या शरीरावर तसेच गळ्यावर वन्यप्राण्याने गंभीर जखमा केल्याचे निदर्शनास आले. हा कोणता प्राणी असेल, याबाबत निश्चित माहिती मिळाली नसल्याने वैद्यकीय अहवाल आल्यानंतरच हे कळेल, असे सुत्रांनी सांगितले.




