पुणे | बुधवार पेठेत पत्नीच्या दुसऱ्या पतीचा खून

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पत्नीने दुसऱ्याशी घरोबा केल्याच्या रागातून पहिल्या पतीने दुसऱ्या पतीचा खून केला. ही घटना बुधवार पेठेतील क्रांती चौकात घडली. फरासखाना पोलिसांनी आरोपीला पुणे रेल्वे स्थानक परिसरात अटक केली.
नईम शेख असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी कलाम उर्फ रूबेल शेख याला अटक करण्यात आली. बुधवार पेठेतील वेश्यावस्तीत पश्चिम बंगालमधील संबंधित महिला राहायला आहे. आराेपी कलाम तिचा पहिला पती आहे. सहा महिन्यांपूर्वी तिने नईम शेख याच्याशी विवाह केला होता. यामुळे कलाम चिडला होता. दरम्यान, शुक्रवारी रात्री क्रांती चौकात नईम हा मुलीला घेऊन थांबला होता. काही वेळानंतर कलाम तेथे आला. त्याने नईमच्या गळ्यावर वस्तऱ्याने वार केला.
गंभीर जखमी नईमला रुग्णालयात नेण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. दरम्यान, कलाम हा साथीदारासोबत पश्चिम बंगालला पसार होण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पुणे रेल्वे स्थानक परिसरातून त्याला साथीदारासह रात्री उशिरा ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक दाढे करत आहेत.





