Pune News : पत्नीची वागणूक त्रासदायक, पण क्रूर नाही; न्यायालयाने पतीचा घटस्फोटाचा अर्ज फेटाळला

पुणे : पत्नीच्या काही वर्तणामुळे पतीस वेदना किंवा निराशेची भावना झाली असेल. मात्र, ही क्रुरता इतकी नाही की, जोडीदाराशी वैवाहिक संबंध ठेवणे असुरक्षित वाटेल, असा निष्कर्ष काढत कौटुंबिक न्यायालयाने पतीने केलेला घटस्फोटाचा अर्ज फेटाळला. याबरोबरच तीन महिन्याच्या आत वैवाहिक नातेसंबंध पुर्नस्थापित करण्याचा आदेशही पतीला दिला आहे. त्यामुळे पतीच्या घरातच राहणाऱ्या पत्नीला दिलासा मिळाला आहे. कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश गणेश घुले यांनी हा आदेश दिला.
माधव (वय ४५) आणि माधवी (वय ४०) (नावे बदलली आहेत) अशी दोघांची नावे आहेत. पत्नीच्या वतीने ॲड. सुचित मुंदडा यांनी न्यायालयात बाजू मांडली. २००९ मध्ये दोघांचा विवाह झाला. तो व्यावसायिक आहे. तर ती गृहिणी आहे. सुरूवातीपासूनच पत्नी योग्य वागणूक देत नाही. आई-वडिलांकडे लक्ष देत नाही. नातेवाईकांनाही त्रास देते. दरवाज्यात अडकवून आईच्या बोटाचे तुकडे केले.
डॉक्टरांनी मागितल्यानंतर जोडण्यास बोटाचा तुकडा देण्यास नकार दिला. पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याचे सांगत तिने वटपौर्णिमा साजरी केली नाही. स्वयंपाक करत नाही. कौटुंबिक कार्यक्रमात विचित्र वागते. मित्रांसमोर अपमान करते. या सर्व प्रकारामुळे शारीरिक आणि मानसिक त्रास होत असल्याचे सांगत २०१६ मध्ये पतीने घटस्फोटासाठी अर्ज केला.
त्यामध्ये पत्नीने ॲड. सुचित मुंदडा यांच्या सल्ल्यानुसार पोटगी आणि स्वत:च्या घरात नांदण्यास परवानगी देण्याची मागणी न्यायालयात केली. पत्नी व दत्तक मुलासाठी दरमहा ५० हजार रुपये पोटगीचा आदेश न्यायालयाने दिला. मुल होत नसल्याने दोघांनी वैद्यकीय उपचार घेतले. मात्र, मूल झाले नाही. त्यामुळे कायद्याच्या तरतुदीनुसार मूल दत्तक घेतले. तिघेही पतीच्या घरात एकत्र राहत आहेत.
पत्नी व मुलाच्या अन्न, वस्त्र, निवारा, वैद्यकीय सेवा आणि मुलाच्या शिक्षणाची काळजी पतीच घेत आहे. पतीकडून क्रुर वागणूक मिळाल्याचे पत्नीने कधीही म्हटले नाही. तसेच, कौटुंबिक हिंसाचार केल्याचे ठोस पुरावे दिले नसल्याचे सांगत पतीची घटस्फोटाची मागणी फेटाळण्याची विनंती पत्नीच्या वतीने न्यायालयाला केली. यावर न्यायालयाने पत्नी काही प्रमाणात क्रुर वागली तरीही, पती-पत्नी एकत्र मुलाच्या जबाबदाऱ्या पार पाडत आहेत. पती व नातेवाई सर्व सुख आणि दु:खात सहभगी होतात, असा निष्कर्ष काढत वरील आदेश दिला.
न्यायालयाच्या निर्णयामुळे महिला पक्षकाराला न्याय मिळवून दिल्याचा आनंद वाटत आहे. मुलाचा विचार करत दोघे नव्याने संसार सुरू करतील.
ॲड. सुचित मुंदडा,
पत्नीचे वकील




