मुंबई – एका 31 वर्षीय व्यक्तीने पत्नी एकटीच मॉर्निंग वॉकला जात असल्यामुळे तिला तलाक दिल्याची विचित्र घटना मुंबई लगतच्या ठाणे जिल्ह्यात घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी पतीवर गुन्हा दाखल केला आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, ठाणे पोलिसांनी एका 31 वर्षीय व्यक्तीवर आपल्या पत्नीला कथितपणे तीहेरी तलाक देण्याचा गुन्हा दाखल केला आहे. तोंडी तलाक देण्यावर 2019 मध्येच बंदी घातली होती. त्यानंतरही या व्यक्तीने या मार्गाचा अवलंब करत आपली संसारगाठ तोडण्याचा प्रयत्न केला. आरोपी व्यक्ती मुंब्रा भागात राहतो. त्याने आपल्यी 25 वर्षीय पत्नीच्या वडिलांना फोन करून आपण ट्रिपल तलाकच्या माध्यमातून घटस्फोट देत असल्याचे सांगितले. यासाठी त्याने आपली बायको एकट्यानेच मॉर्निंग वॉकला जात असल्याचे कारण दिले. तक्रारीनुसार आरोपीविरोधात बुधवारी भारतीय न्याय संहिता कलम 351 (4) गुन्हेगारी धमकी व मुस्लिम महिला (विवाह अधिकार संरक्षण) कायद्यांतर्गत एफआयआर दाखल केला. पोलिसांनी गुरुवारी ही माहिती दिली. अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे सांगितले आहे. भारतात असा तलाक घटनाबाह्य – सर्वोच्च न्यायालयाच्या 5 सदस्यीय घटनापीठाने 22 ऑगस्ट 2017 रोजी ट्रिपल तलाक घटनाबाह्य असल्याचे घोषित केले होते. सुप्रीम कोर्टाने 1400 वर्ष जुनी परंपरा घटनाबाह्य घोषित करत सरकारला यासंबंधी कायदा तयार करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार केंद्राने संसदेत एक कायदा पारित करून या कुप्रथेचा पायबंद केला होता. प्रस्तुत कायद्यानुसार, तीन तलाक देणे फौजदारी गुन्हा असून, त्यासाठी किमान 3 वर्षांच्या कैदेच्या शिक्षेची तरतूद आहे.