सातारा – सातारा जिल्ह्यात राबवण्यात येत असलेला स्मार्ट स्कूलचा उपक्रम ठाणे जिल्ह्यातही राबवण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सूचना केली होती. त्यानुसार स्मार्ट स्कूलचा सातारा पॅटर्न ठाणे जिल्ह्यातही राबवण्यात येणार आहे. स्मार्ट स्कूल उपक्रमातून गुणवत्ता वाढीसाठी मदत होणार असून या उपक्रमाला लाेकसहभागाची साथ मिळाल्यास हा उपक्रम निश्चितच यशस्वी होइल, असा विश्वास जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला. जिल्हा परिषदेच्या माझी शाळा आदर्श शाळा उपक्रमांतर्गत जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव सभागृहात सोमवारी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कृष्णा विकास महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, प्रभारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश घुले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे, कार्यकारी अभियंता मोहसीन मोदी, शिक्षणाधिकारी प्राथमिक शबनम मुजावर, शिक्षणाधिकारी माध्यमिक प्रभावती कोळेकर, उपशिक्षणाधिकारी रविंद्र खंदारे, तेजस गंबरे, कृषी विकास अधिकारी विजय माइनकर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विनोद पवार आदी उपस्थित होते. ना. देसाई म्हणाले, माझी शाळा आदर्श शाळा या उपक्रमाला जिल्हा वार्षिक योजनेतून १०० कोटींचा निधी दिला आहे. असा निधी देणारा सातारा जिल्हा पहिला आहे. मागील वर्षी ५० शाळांची निवड करण्यात आली होती. आता जिल्ह्यातील२२३ शाळा आदर्श शाळा करण्यात येणार आहे. या शाळेचे काम मुदतीत पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. शाळेच्या विकासात शिक्षक, ग्रामपंचायत व ग्रामस्थांचा सहभाग महत्वाचा आहे. या सर्वांनी या शाळांना सहकार्य करावे. या उपक्रमामुळे शैक्षणिक गुणवत्तेबरोबर शाळेचा पट देखील वाढणार आहे. या उपक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी सहकार्य केले. स्मार्ट स्कूल नंतर आगामी काळात स्मार्ट पीएचसी संदर्भात कार्यशाळा घेण्यात येणार असून जिल्हावासियांना चांगल्या दर्जाचे उपचार देण्यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे. एका शाळेसाठो ७० ते ८० लाख खर्च अपेक्षित असून शासन स्तरावरुन निधी दिला जात असला तरी त्यातील २५ टक्के निधी गावाने विविध मार्गातून द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. ना. महेश शिंदे म्हणाले, प्रशासनाचे पालकमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली आदर्शवत काम सुरु आहे. संस्कारक्षम पिढी घालवण्यासाठी आदर्श कुटुंबाची संस्काराची शिकवण शाळेमध्ये द्यावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले. जितेंद्र डुडी म्हणाले, माझी शाळा आदर्श शाळा उपक्रमांतर्गत सुरुवातीला ५० शाळांचा समावेश करण्यात आला होता. आता या उपक्रमाची व्याप्ती वाढवली असून या अंतर्गत २२३ शाळा निर्माण करण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी ग्रामपंचायतीचा मोलाचा सहभाग असणार आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीच्या बैठकांमध्ये माझी शाळा आदर्श शाळा उपक्रमाचा आढावा घेण्यात यावा. जिल्हा वार्षिक योजनेतून १०० कोटींचा निधी देण्यात आला आहे. ग्रामपंचायतींनीही पंधरावा वित्त आयोगातून या शाळेसाठी निधी खर्च करावा. सर्व कामांच्या प्रशासकीय मान्यता करण्यात आल्या असून एप्रिलपूर्वी कामे पूर्ण होतील यादृष्टीने काम करावे. जिल्हा परिषद शाळांमध्ये चांगल्या प्रकारचे शिक्षण देण्याचा आपला प्रयत्न असून आगामी काळात खासगी शाळांकडे जाण्याची गरज भासणार नाही. सांगली जिल्हा आम्ही राज्यात टॉप 3 मध्ये आणला. सातारा जिल्हयात सांगली पेक्षा चांगला शिक्षक वर्ग आहे. राज्यात शिक्षणासाठी एवढा निधी कोणत्याच जिल्ह्याला मिळाला नसून जिल्हयात चांगले शिक्षण देण्याबरोबरच चांगले खेळाडू तयार करण्यावर भर देण्यात येणार आहे. शाळेतील सोयी सुविधा वाढवण्यासाठी ग्रामस्थ, गावातील नागरिकांबरोबरच बाहेरगावी राहणारे गावातील उद्योजक, व्यावसायिक यांचीही मदत घ्यावी. सातारा जिल्हा हा क्रांतीकारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो शिक्षण क्षेत्रातही आपण या उपक्रमांतर्गत क्रांती घडवून आणू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. प्रास्ताविकात याशनी नागराजन म्हणाल्या, माझी शाळा आदर्श शाळा उपक्रमांतर्गत२२३ शाळा तयार करण्यात येणार आहेत. या शाळांमध्ये भौतिक सुविधा वाढवण्यावर भर देण्यात येत आहे. पटसंख्या व शाळेचे कार्यक्षेत्र यावर शाळेची निवड करण्यात आली आहे. शाळांनी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेअंतर्गत संगणक शिक्षकाची नियुक्ती करावी. या संगणक शिक्षकांचे पगार शासन करणार असल्याचे सांगून त्यांनी माझी शाळा आदर्श शाळा उपक्रमाची सादरीकरणाद्वारे माहिती दिली. जिल्ह्यात निवड झालेल्या२२३ शाळांमध्ये स्पर्धा घेवून प्रत्येक तालुक्यातून दोन शाळांची पुरस्कारासाठी निवड करण्या असल्याचे नागराजन यांनी स्पष्ट केले. यावेळी आनंददायी अभ्यासक्रम या पुस्तिकेचे तसेच शैक्षणिक दिनदर्शिकेचे व शिक्षक मार्गदर्शिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले. यावेळी विविध गावचे सरपंच, उपसरपंच, शाळा समितीचे अध्यक्ष, मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते. शिक्षणात राजकारणाला थारा नसेल – ना. देसाई स्मार्ट स्कूलअंतर्गत शाळांची निवड करताना नियमानुसार प्रक्रिया राबवण्यात आली आहे. कोठेही राजकीय हस्तक्षेप येवून दिला नाही. पाटणमध्ये पहिल्या टप्प्यात म्हावशी गावाची निवड करण्यात आली असून ते गाव विक्रमसिंह पाटणकर यांचे आहे. त्यामुळे शिक्षणामध्ये आम्ही राजकारणाला अजिबात थारा देत नाही, असे स्पष्ट मत पालकमंत्री शंभूराज देसाइ यांनी व्यक्त केले. प्रशासनातील त्रिमुर्ती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधिक्षक समीर शेख हे प्रशासनातील त्रिमुर्ती आहेत. जिल्हाधिकारी व एसपी ही रामकृष्णाची जोडी आहे. तिन्ही अधिकारी सकारात्मक दृष्टीकोन ठेवून काम करत आहेत. याशनी नागराजन यांचा तर प्रत्येक गोष्टीत सकारात्मक दृष्टीकोन दिसून येतो. अत्यंत कमी कालावधीत त्यांनी कार्यक्रमाचे चांगले नियोजन केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. याशनी नागराजन बोलायला तयार झाल्याचे आजच्या प्रास्ताविकातून दिसून आले.