Dhule Crime : सैतान बापाकडून पोटच्या लेकरांची हत्या! कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

धुळे : धुळे जिल्ह्यातून वडील या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. यामध्ये एका नराधम बापाने एका शुल्लक कारणामुळे आपल्या पोटच्या लेकरांचा जीव घेतला आहे. धुळे जिल्ह्यातील थाळनेर गावात ही संतापजनक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
का केली हत्या?
कार्तिक कोळी आणि चेतना कोळी असं मृत्यू झालेल्या दोन्ही भावा-बहिणींची नावं आहेत. कार्तिक हा अवघ्या 6 वर्षांचा तर चेतना ही 3 वर्षांची होती. बायकोने दारू प्यायला पैसे दिले नाहीत, म्हणून जन्म देणाऱ्या बापानेच दोन्ही मुलांना तापी नदीत फेकून त्यांची हत्या केली आहे. थाळनेर गावातील भुईकोट किल्ल्याशेजारी असलेल्या तापी नदीच्या पात्रात दोन लहान मुलांचे मृतदेह गावकऱ्यांना तरंगताना आढळून आले.
यानंतर गावकऱ्यांनी तातडीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून पत्नीसोबत वाद झाल्यानंतर बापानेच दोन्ही मुलांना तापी नदीच्या पात्रात फेकल्याचं पोलीस तपासात समोर आलं. याप्रकरणी पत्नी छायाबाई कोळी हिच्या फिर्यादीवरून थाळनेर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर आरोपी संजय कोळीला थाळनेर पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे.





