satara | रामनगर ते लिंब खिंङ रस्त्याचे रुंदीकरण सुरु

सातारा, (प्रतिनिधी)- सातारा ते पुणे जुन्या महामार्गावर रामनगर ते लिंब खिंडीपर्यंत रस्त्याचे रुंदीकरण सुरु झाले आहे. या रस्त्यावरून वाहनचालकांना वाहतूक करणे कठीण जात होते. या मार्गावर अनेकदा छोट्यामोठ्या अपघाताच्या घटना घडल्या आहेत. सध्या या रस्त्याचे रुंदीकरण सुरू झाल्याने या मार्गावरून वाहतूक करणे आता सोयीचे होणार आहे.
लिंब खिंडीतून सातारा शहराकडे प्रवास करताना लिंब खिंड ते रामनगरपर्यंतचा अरुंद रस्ता वाहनांसाठी खूपच धोकादायक ठरत होता. वळणदार मार्गाचे रुंदीकरण व्हावे यासाठी वाहनचालक व ग्रामस्थांची मागणी होती. या मार्गावरून वाहनांची ये जा मोठ्या प्रमाणात असल्याने तसेच या परिसरातील वाढलेल्या शिक्षण संस्था व मंगल कार्यालयामुळे नागरिक व विद्यार्थ्यांचा अधिक वावर असतो.
रामनगर ते लिंब खिंड महामार्गावरील मुख्य रस्त्यालगतच्या साईडपट्ट्या खचल्याने वाहन चालकांची वाहने घसरून या ठिकाणी अपघाताची घटना घडत होत्या. रात्रीच्या वेळी या परिसरात अंधाराचे साम्राज्य असल्याने रस्त्यालगतच्या भागाचा अंदाज वाहन चालकाला येत नसल्याने या ठिकाणी अपघाताचे प्रमाण वाढले होते.
प्रशासनाने याची दखल घेऊन या रस्त्याचे रुंदीकरण केल्याने अपघातग्रस्त महामार्ग सुरक्षित प्रवासासाठी सुकर झाला आहे. रस्त्याच्या रुंदीकरणामुळे अपघातांच्या संख्येना आता आळा बसेल असे श्रीरंग काटेकर यांनी सांगितले.





