Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूर अचानकपणे का थांबवले? कॉंग्रेसचा पंतप्रधान मोदींना पुन्हा सवाल

नवी दिल्ली – भारतीय हवाई दल प्रमुखांनी दिलेल्या माहितीनंतर कॉंग्रेसने पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून सवाल केला. ऑपरेशन सिंदूर अचानकपणे का थांबवले, अशी विचारणा त्या पक्षाने केली. हवाई दल प्रमुख अमरप्रीत सिंग यांनी पाकिस्तानची विमाने पाडण्यात आल्याची महत्वपूर्ण माहिती उघड केली.
त्या पार्श्वभूमीवर, कॉंग्रेसने मोदींना घेरण्याचे सत्र सुरूच ठेवले. हवाई दल प्रमुखांनी नवे खुलासे केले. ते पाहता मोदींनी १० मेच्या सायंकाळी ऑपरेशन सिंदूर अचानकपणे का थांबवले असा प्रश्न आणखीच चकित करणारा ठरतो. मोदींवर कुठून दबाव आला ? त्यांना तातडीने का झुकावे लागले, अशी प्रश्नार्थक प्रतिक्रिया कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी दिली.
जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी २२ एप्रिलला पर्यटकांना लक्ष्य करत भयंकर हल्ला घडवला. त्याचा हिशेब चुकता करण्यासाठी भारतीय सशस्त्र दलांनी ऑपरेशन सिंदूर राबवले. त्यावेळी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर प्रहार करण्यात आला. त्या धडक मोहिमेमुळे पाकिस्तान बिथरला.
पाकिस्तानी सैन्याने भारतीय ठिकाणांवर मारा करण्याचा प्रयत्न केला. त्या नापाक माऱ्याला भारतीय सशस्त्र दलांनी जबर प्रत्युत्तर दिले. त्यामुळे मे महिन्यात भारत आणि पाकिस्तानमध्ये ४ दिवस लष्करी संघर्ष झाला. त्यानंतर दोन्ही देशांत समझोता होऊन संघर्षविराम घडला. तो आपण घडवल्याचा दावा सातत्याने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प करत आहेत.
त्यामुळे पाकिस्तानची दाणादाण उडाल्यानंतरही अचानकपणे घडलेला संघर्षविराम आणि ट्रम्प यांचा दावा आदींवरून विरोधक मोदी आणि त्यांच्या सरकारवर प्रश्नांची सरबत्ती करत आहेत. त्यामध्ये कॉंग्रेस आघाडीवर आहे. आता हवाई दल प्रमुखांनी दिलेल्या माहितीचा आधार घेऊन तो पक्ष पुन्हा सरकारची कोंडी करण्यासाठी पुढे सरसावला आहे.





