जम्मू-काश्‍मीरबाबत “राष्ट्रवादी’ गप्प का होती

बारामतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सवाल

बारामती- मजबूत राष्ट्राची उभारणी करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जम्मू-काश्‍मीरमधील कलम 370 रद्द केले. मात्र, जम्मू-काश्‍मीरच्या विलीनीकरणाकरीता राष्ट्रवादी कॉंग्रेसने मतदान का केले नाही? असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित करून माजी कृषिमंत्री शरद पवार यांच्यावर निशाणा साधला.

भाजपची महाजनादेश यात्रा आज पवारांच्या बारामतीत आली होती. ही यात्रा तीनहत्ती चौकात आल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी रथावरूनच जनतेशी संवाद साधला त्यावेळी शेरोशायरी करीत पवारांना टार्गेट केले. यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री बाळा भेगडे, खासदार अमर साबळे, कॉंग्रेसमधून अताच भाजपमध्ये दाखल झालेले हर्षवर्धन पाटील आदींचे स्वागत बाळासाहेब गावडे, अविनाश मोटे, दिलीप खैरे, प्रशांत सातव, नितीन भामे, कुलभूषण कोकरे, रंजन तावरे, पृथ्वीराज जाचक, सतीश फाळके आदींनी केले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, जम्मू काश्‍मीर भारतात आणण्याच्या प्रस्तावाला कॉंग्रेसने देखील विरोध केला. तसेच 15 वर्षांत आघाडी सरकारने जेवढे काम केले नाही त्याच्या दुप्पट काम सरकारने केले असल्याचे सांगत पाच वर्षांत केलेल्या कामाचा “लेखाजोखा’ मुख्यमंत्र्यांनी बारामतीच्या महाजनादेश यात्रा मांडला. तसेच बारामतीमध्ये परिवर्तनाची हवा मला दिसते आहे, बारामतीत प्रवेश केल्यापासून लोकांनी जे उत्स्फूर्त स्वागत केले, इथे केवळ स्वागत सभा ठरविली होती, पण स्वागत सभेला तुम्ही महाजनसभेमध्ये तुम्ही परिवर्तीत केले त्या बद्दल बारामतीकरांचे मी आभार मानतो.

  • …अन्‌ भाजप-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले
    भाजपची महाजनादेश यात्रा आज पवारांच्या बारामतीत आली होती. यानिमित्ताने शहरात ठिकठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागताचे पोस्टर लावले होते. हे सर्व पोस्टर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून काढण्यात आले. तसेच शांतता परिसरात डीजे लावल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून तो काढण्यात आल्याने दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये काही काळ तणाव निर्माण झाला होता. तर मुख्यमंत्र्यांनी शेरोशायरीद्वारे पवारांवर टीका केल्याने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि भाजपविरोधी घोषणा देण्यास सुरुवात केली. तर दुसरीकडे शांतता परिसरात डीजे लावण्यावरुन आणि चौका-चौकात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लावलेले पोस्टर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून काढण्यात आल्याने दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांमध्येही काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. या सर्व वादानंतर पोलिसांनी राष्ट्रवादीच्या कार्यककर्त्यांना पांगवले.
  • राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची धरपकड
    बारामती शहरात एमआयडीसी परिसरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेत गोंधळ घालण्यासाठी आंदोलनाच्या पवित्र्यात असलेले राष्ट्रवादी युवक प्रदेश उपाध्यक्ष किशोरजी मासाळ, युवती अध्यक्ष भाग्यश्री धायगुडे, जिल्हा युवक उपाध्यक्ष पार्थ गालिंदे, विद्यार्थी अध्यक्ष उत्कर्ष गलांडे,धनगर आंदोलक पंकज देवकाते,युवक तालुका उपाध्यक्ष किरण कारंडे,युवती सरचिटणीस रोहिणी अटोळे,भाग्यश्री सुर्यवंशी, शुभम मोरे, दादा शिरसठ यांना पोलीसांनी ताब्यात घेत स्थानबद्ध केले होते. त्यानंतर या कार्यकर्त्यांना बारामती तालुका पोलीस ठाण्यात आणण्यात आले व महाजनादेश यात्रा पुढे गेल्यावर त्यांना सोडण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.