Gold In Dubai: कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला 14.8 किलो सोन्यासह अटक केल्यानंतर दुबई आणि सोने पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. वास्तविक रान्या राव एमिरेट्सच्या विमानाने दुबईहून बंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळावर (कंपगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ) पोहोचली होती. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की तिने कपड्यांमध्ये लपवून सोने आणले होते. तिच्या सततच्या आंतरराष्ट्रीय यात्रांवर डीआरआय (डिरेक्टोरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स) लक्ष ठेवून होते आणि यावेळी डीआरआयने तिच्याकडून 12.56 कोटी रुपयांच्या सोन्याचे बार जप्त करून तिला अटक केली. आता प्रश्न असा आहे की लोक दुबईतून एवढे सोने का आणतात? भारतापेक्षा दुबईत सोने स्वस्त आहे का? उत्तर आहे- होय. दुबईत सोन्याच्या किमती भारताच्या तुलनेत नेहमी कमी असतात. त्यामुळे दुबईच्या सोन्याची बाजारपेठ सोने खरेदीदारांना आकर्षित करते. दुबईत सोने स्वस्त का आहे? आयात शुल्क आणि कर धोरणांमधील फरकांमुळे दुबईतील सोन्याच्या किमती नेहमी भारतातील किमतींपेक्षा कमी असतात. उदाहरणार्थ, दुबईमध्ये सराफा आणि सोन्याच्या दागिन्यांवर शून्य GST आहे, तर भारत सोन्यावर 3% GST आकारली जातो. याशिवाय, दुबईतील ज्वेलरी स्टोअरमध्ये उत्पादन खर्च अगदी वाजवी आहे, दुबईमध्ये 24 कॅरेट सोने भारतापेक्षा 5% ते 7% स्वस्त असते. दुबईतून मोठ्या प्रमाणात सोने खरेदी केल्यावर ग्राहक अधिक पैसे वाचवतात. मात्र दुबईहून भारतात सोने आणताना कस्टम ड्युटीचे नियम विसरता कामा नये. तुम्ही किती सोने आणू शकता? नियमांनुसार, जर एखादा भारतीय प्रवासी दुबईमध्ये सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ राहून भारतात परतला तर तो कस्टम ड्युटी भरल्यानंतर त्याच्या बॅगेजमध्ये 1 किलोपर्यंत सोने आणू शकतो. ड्युटी फ्री सोने आणण्याच्या मर्यादेबद्दल बोलायचे झाल्यास, पुरुष प्रवासी 20 ग्रॅम (50,000 रुपये किमत) पर्यंत सोने दुबईहून कस्टम ड्युटीशिवाय देशात आणू शकतात. पुरुष प्रवासी देशात सोन्याची नाणी किंवा बार आणू शकतात. तर महिला प्रवाशांसाठी, दुबईहून कस्टम ड्युटीशिवाय देशात सोने आणण्याची मर्यादा 40 ग्रॅम (1,00,000 रुपये किमत) पर्यंत आहे. महिला प्रवासी दागिने, बार किंवा नाण्यांच्या रूपात सोने आणू शकतात. दुबईहून आणलेल्या सोन्याने ही मर्यादा ओलांडल्यास, सोने आणणाऱ्या प्रवाशाला कस्टम ड्युटी भरावी लागेल, जे सोन्याच्या मूल्याच्या 3 ते 10% असू शकते. पडताळणीसाठी प्रवाशांना खरेदी केलेल्या सोन्याचे बिल कस्टम अधिकाऱ्यांना दाखवावे लागेल. मुले किती ड्युटी फ्री सोने आणू शकतात- 15 वर्षांखालील मुले दुबईतून 40 ग्रॅमपर्यंतचे सोन्याचे दागिने सीमा शुल्काशिवाय देशात आणू शकतात. यामध्ये लहान मुलांना दिल्या जाणाऱ्या सोन्याच्या भेटवस्तूंचा समावेश आहे. मात्र दुबईहून सोने आणणाऱ्या मुलाकडे सोबत असलेल्या वडिलधाऱ्यांसोबतचे नाते दाखवणारे ओळखपत्र असणे आवश्यक आहे. रान्या रावला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी- विमानतळावर रान्या रावकडून सोने जप्त केल्यानंतर तिच्या घराची झडती घेण्यात आली आणि 2.06 कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने आणि 2.67 कोटी रुपयांचे भारतीय चलनही जप्त करण्यात आल्याचे डीआरआयचे म्हणणे आहे. राव ही वरिष्ठ आयपीएस अधिकारी रामचंद्र राव यांची सावत्र कन्या आहे. रामचंद्र राव, DGP दर्जाचे अधिकारी, सध्या कर्नाटक राज्य पोलीस गृहनिर्माण आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम पाहत आहेत. या प्रकरणातील एकूण जप्ती 17.29 कोटी रुपये आहे. सोमवारी रात्री अटक केल्यानंतर रान्या रावला आर्थिक गुन्हे न्यायालयात हजर करण्यात आले, न्यायालयाने तिला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दुबईमध्ये सोन्याचा भाव – 6 मार्च 2025 रोजी दुबईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 327 दिरहम प्रति ग्रॅम होती. त्याच वेळी, 24 कॅरेट सोन्याची किंमत 349.50 दिरहम प्रति ग्रॅम होती. एक दिरहम म्हणजे सुमारे 23.71 रुपये. 327 दिरहम × 23.71 रुपये = 7,749 रुपये ग्राम सोन्याची किंमत होती. तर दिल्लीत 22 कॅरेट सोन्याचा आजचा दर 8,120 रुपये होता. म्हणजेच दुबई आणि भारताच्या 22 कॅरेट 1 ग्रॅम सोन्याच्या दरात 371 रुपये तफावत आहे. भारतापेक्षा दुबईत आज एक ग्राम सोने 371 रुपयांनी स्वस्त होते. एक तोळ्याचा दर पाहिल्यास भारतापेक्षा दुबईत सोने 3,710 रुपये प्रतितोळा स्वस्त. हे दर दररोज कमी-जास्त होत असतात. मात्र भारतापेक्षा दुबईत सोने स्वस्तच असते.