बंगळुरू : सोन्याच्या तस्करी प्रकरणात अटक करण्यात आलेली कन्नड अभिनेत्री रान्या रावला न्यायालयाने पुन्हा एकदा दणका दिला आहे. बंगळुरूच्या सत्र न्यायालयाने अभिनेत्रीचा जामीन अर्ज फेटाळला आहे. तिचा जामीन अर्ज तिसऱ्यांदा फेटाळण्यात आला आहे. ३ मार्च रोजी रान्याला बेंगळुरूतील केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर १४ किलो सोन्यासह (सुमारे १२.५६ कोटी रुपये किमतीचे) अटक करण्यात आली होती. यानंतर, अधिकाऱ्यांनी तिच्या घराचीही झडती घेतली होती व तेथे त्यांना २.०६ कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने आणि २.६७ कोटी रुपयांची रोख रक्कम मिळाली होती. चौकशीदरम्यान, रान्याने पोलिसांना सांगितले की ती २०२३ ते २०२५ दरम्यान ५२ वेळा दुबईला गेली होती. सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगितले होते की, रान्या रावने कबूल केले की तिने सोने खरेदी करण्यासाठी हवालाद्वारे पैसे ट्रान्सफर केले होते. महसूल गुप्तचर संचालनालयाचे (डीआरआय) वकील मधु राव यांनी न्यायालयाला सांगितले की, रान्याने सोने खरेदी करण्यासाठी हवाला पैशाचा वापर केल्याची कबुली दिली आहे. या खुलाशानंतर, तपास यंत्रणांनी हे प्रकरण अधिक गांभीर्याने घेण्यास सुरुवात केली आहे. या प्रकरणात, डीआरआयने कलम १०८ अंतर्गत नोटीस बजावली आहे, जी न्यायालयीन चौकशीची प्रक्रिया पुढे नेण्यासाठी केली जाते. आता गुन्ह्यातील आर्थिक अनियमितता आणि संभाव्य कायदेशीर उल्लंघनांची चौकशी केली जाईल.