दहशवाद्यांनी हल्ल्यासाठी 22 एप्रिलच तारीख का निवडली? NIA च्या तपासात कारण उघडकीस

Pahalgam Attack : जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याने देशभर संतापाची लाट पसरली आहे. या हल्ल्यात २६ निष्पाप नागरिकांचा बळी गेला, त्यापैकी ६ जण महाराष्ट्रातील होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी दहशतवाद्यांना “कल्पनेपलीकडील शिक्षा” देण्याचा इशारा दिला आहे. भारताने पाकिस्तानविरुद्ध कठोर पावले उचलत हवाई हद्द बंद केली असून, भारतीय सैन्य आणि सुरक्षा यंत्रणांना पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे.
एनआयएच्या तपासात धक्कादायक खुलासे –
राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) हल्ल्याचा तपास तीव्र केला असून, महत्त्वाची माहिती समोर आली आहे. दहशतवाद्यांनी हल्ल्याच्या ८ दिवस आधी पहलगामच्या बैसरण परिसरातील तीन ठिकाणांची रेकी केली होती. २० आणि २१ एप्रिलला पावसामुळे पर्यटकांची संख्या कमी होती, त्यामुळे हल्ल्याचा कट रद्द करून २२ एप्रिल हा पर्यटकांच्या गर्दीचा दिवस निवडला गेला. बैसरणमधील अम्युझमेंट पार्क आणि अन्य दोन ठिकाणांची रेकी केल्यानंतर गर्दीमुळे पहलगाम घाटीला लक्ष्य करण्यात आले.
महाराष्ट्र सरकारची मदत –
महाराष्ट्र सरकारने हल्ल्यातील ६ मृत नागरिकांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपये आर्थिक मदत आणि प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी देण्याची घोषणा केली. “राज्य सरकार पीडितांच्या पाठीशी आहे,” असे सरकारने स्पष्ट केले.
जागतिक पाठिंबा, भारताचा निर्धार –
या हल्ल्याचा अनेक देशांनी निषेध केला असून, भारताला पाठिंबा दिला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली तिन्ही सैन्यदलांच्या प्रमुखांसोबत सातत्याने बैठका सुरू आहेत. एनआयएचा तपास आणि भारताची आक्रमक भूमिका पाहता दहशतवाद्यांना लवकरच चोख प्रत्युत्तर मिळेल, अशी जनभावना आहे. हा हल्ला भारताच्या संयमाची परीक्षा घेणारा असला, तरी देश दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एकजुटीने उभा आहे.





