Ravindra Dhangekar : काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी आज काँग्रेसला सोडचिट्ठी दिली आहे. त्यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचे घोषित केले आहे. रवींद्र धंगेकरांनी काँग्रेस सोडल्यामुळे पुण्यात काँग्रेसचं मोठं नुकसान झालं आहे. २०१९ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या आधी राज्यात काँग्रेसला मोठी गळती लागली होती. त्या काळात पक्षातील अनेक मोठे नेते पक्ष सोडून भाजपा व शिवसेनेत गेले होते. मात्र, रवींद्र धंगेकरांनी पुणे जिल्ह्यात काँग्रेसचे अस्तित्व टिकवून ठेवले होते. आता मात्र पुण्यात काँग्रेसकडे मोठं नेतृत्व राहिलेलं दिसत नाही. विधानसभेच्या पोटनिवडणुकीत कसब्यातील विजयानंतर कार्यकर्त्यांना हुरुप वाढला होता. त्याचे प्रत्यंतर लोकसभा निवडणुकीत आले. रवींद्र धंगेकर यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना चांगलीत लढत दिली होती. मात्र, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे हेमंत रासने यांनी त्यांचा पराभव केला. त्यानंतर धंगेकर हे काँग्रेसपासून अलिप्त असल्यासारखे दिसत होते. धंगेकरांच्या पराभवात काँग्रेसचाच हात? विधानसभा निवडणुकीमध्ये धंगेकर यांना कसब्यातून पराभव पत्करावा लागला होता. त्यांच्या पराभवात काँग्रेसचाच हात असल्याची त्यांची भावना होती. कारण या मतदार संघात माजी महापौर कमल व्यवहारे यांनी बंडखोरी केली होती. ही बंडखोरी रोखण्यासाठी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी फारसे प्रयत्न केले नाहीत. स्थानिक नेत्यांचा असहकार पाहून त्यांनी स्वत:ची प्रचारयंत्रणा कामाला लावली होती. तेव्हापासून रवींद्र धंगेकर नाराज होते. धंगेकरांची लोकप्रतिमा काँग्रेसच्या काही स्थानिक नेत्यांना त्रासदायक तसेच धंगेकर यांची वाढती लोकप्रतिमा ही काँग्रेसच्या काही स्थानिक नेत्यांना त्रासदायक वाटत होती. धंगेकर हे भविष्यात पक्षावर कब्जा करतील, या भीतीपोटी पक्षाच्या कामकाजापासून त्यांना दूर ठेवण्यात येत असल्याचे चित्र निर्माण झाले होते. धंगेकर हे बाहेरील पक्षातून येऊनही त्यांना लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत उमेदवारीची संधी मिळाल्याने काही नेत्यांच्या मनात खदखद होती. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत त्यांनी रवींद्र धंगेकरांना एकाकी पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. विधासभा निवडणुकीनंतर धंगेकर हे काँग्रेस पक्षाच्या कारभारापासून दूर होते. ते कोणत्याही आंदोलन किंवा पक्षाच्या कार्यक्रमाला उपस्थित रहात नव्हते. तेव्हापासून ते नाराज असल्याची चर्चा होती. अखेर त्यांनी काँग्रेसला रामराम करत शिवसेनेत प्रवेश केला. महापालिका निवडणुकीच्या जबाबदारीतून धंगेकरांना वगळले पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून सात विधानसभा मतदारसंघांमध्ये निरीक्षकाच्या नियुक्ती नुकतीच करण्यात आली आहे. यामध्ये माजी आमदारांसह पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना प्रत्येक मतदारसंघाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या नियुक्त्यांमध्ये कुठेतरी रवींद्र धंगेकर यांना डावल्याची कुजबुज राजकीय वर्तुळात सुरु होती. रविंद्र धंगेकर यांची राजकीय कारकीर्द रविंद्र धंगेकर यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरूवात शिवसेनेतून केली. १९९७ ते २००६ या काळात ते शिवसेनेत होते. २००६ ते २०१७ या ११ वर्षाच्या काळात ते मनसे मध्ये होते. २०१७ ला ते पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यांना या निवडणुकीत काँग्रेसने मदत केली होती. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. २०२३ मध्ये कसबा या भाजपच्या बालेकिल्ल्यात पोटनिवडणुकीत विजय मिळवला. २०२४ ला काँग्रेस पक्षाने त्यांना पुणे लोकसभा मतदारसंघांची उमेदवारी दिली होती मात्र त्यांचा मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पराभव केला होता. शिवसेनेत जाण्यामागचं नेमकं कारण काय? मी पक्षाला कधी दोष दिला नाही आणि देणार नाही. मी ज्या भागात वर्षानुवर्षे काम करत आहे, तेथील लोकांशी बोललो. मग लक्षात आलं की, तुम्हाला काम करावचं लागेल, पण सत्तेशिवाय काम होत नाही. तसेच एकनाथ शिंदे साहेब आणि उदय सामंत यांनी मला अनेकदा फोन केले. धंगेकर आमच्याकडे या, अशी ऑफर दिली. आमच्यात मित्रत्त्वाचं नातं असल्याने एकत्र काम करण्याचे ठरवले, असे धंगेकर म्हणाले.