देवेंद्र फडणवीसांना शरद पवारांचेच 2 आमदार ‘लाडके’ का? नेमकी रणनीती काय?

मुंबई : महायुती सरकारमध्ये भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीनही मित्रपक्षांमध्ये खटके उडाल्याचे दिसत आहे. काही दिवसापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही नेत्यांच्या सुरक्षा कमी केल्या आहेत. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना त्यांनी मंजुरी दिलेल्या काही प्रकल्पना स्थगिती दिली आहे. तसेच मंत्र्यांच्या पीए, ओसडी यांच्या नियुक्तीवरुन राजकारण चांगलाच पेटलं आहे.
असं असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चक्क महाविकास आघाडीच्या दोन बड्या नेत्यांना सरकारी पीए दिले आहेत. जयंत पाटलांकडे उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभागाचे सहाय्यक कक्ष अधिकारी गौरव भोसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर उद्योग विभाग कक्ष अधिकारी संजय पाटील हे देखील जयंत पाटलांच्याच सेवेत असणार आहे.
तर दुसरीकडे ईव्हीएमविरोधात आंदोलन उभं करणाऱ्या उत्तम जानकरांनाही सरकारकडून स्पेशल ट्रिटमेंट दिली आहे. कारण उत्तम जानकर यांच्या सेवेत सरकारच्या ग्रामीण विकास अधिकाऱ्यांनी त्यांना वैयक्तिक सहाय्यक म्हणून नियुक्त केले आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत.
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे. त्यांनी नुकतीच भाजप प्रदेशाध्य़क्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेटही घेतली होती. तर दुसरीकडे विधानसभा निवडणुकीच्या निकालावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत ईव्हीएमचा मुद्दा पेटवणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचेच शरदचंद्र पवार पक्षाचे नेते व माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांनी गेल्या काही दिवसांतच उपमुख्यमंत्री अजित पवारांची दुसर्यांदा भेट घेतली आहे.
तसेच त्यांनी शनिवारी (ता.1 मार्च) एकाच गाडीतून प्रवास केल्याची माहिती मिळत आहे. हे दोन्ही नेते शरद पवारांच्या पक्षाचेच असल्यानं त्यांनाच सरकारी पीए देण्यामागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारची काही विशेष रणनीती आहे का? अशी शंका उपस्थित केली जात आहे.
राज्याच्या राजकारणात लवकरच मोठा राजकीय भूकंप होणार असल्याची चर्चा सुरु आहे. यामध्ये जयंत पाटलांच्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजप नेत्यांशी आणि अजित पवारांशी वाढती जवळीक यावरुन कुठेतरी पाणी मुरत असल्याची चर्चा आहे. तर ज्या उत्तम जानकरांनीही सुरुवातीला अजित पवारांच्या विजयावरच शंका घेत त्यांच्यावर टीका केली. एकवेळ तर त्यांच्या आक्रमक ईव्हीएम विरोधातलं आंदोलनामुळे सरकारची डोकेदुखी चांगलीच वाढली होती. आधीच पक्षात नाराज असल्याच्या चर्चा अन् त्यात भर म्हणजे जयंत पाटील आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उमेदवारीसाठी महाविकास आघाडीमध्ये गेलेल्या अनेक नेतेमंडळी पुन्हा महायुतीमध्ये परतण्यास उत्सुक आहेत. महाविकास आघाडीचे अनेक नेते महायुतीमध्ये प्रवेश करताना दिसत आहेत. याचवेळी आता शरद पवारांच्या दोन बड्या नेत्यांना राज्य सरकारकडून मोठं गिफ्ट मिळाले आहे. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
महाराष्ट्र विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन तीन मार्चपासून सुरु होणार आहे. तसेच राज्याचा अर्थसंकल्प १० तारखेला मांडण्यात येणार आहे. या अर्थसंकल्पात विरोधकांकडून मंत्री धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याचा मुद्दा उचलून धरण्याची शक्यता आहे. तसेच विधानसभा निवडणुकीतील ईव्हीएमच्या मुद्द्यांवरूनही राजकारण तापण्याची शक्यता आहे.
या दोन्ही मुद्द्यांवरुन सभागृहात सत्ताधारी महायुती सरकारला घेरण्याची जबाबदारी जयंत पाटील अन् त्यांच्या जोडीला उत्तमराव जानकर यांच्यावर असण्याची शक्यता आहे. याच पार्शवभूमीवर सरकारकडून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्याआधीच विरोधी बाकावरील दोन प्रमुख नेत्यांनाच पीए देण्याची घोषणा करुन देवेंद्र फडणवीसांनी त्यांना खूश करण्याचा प्रयत्न केला असल्याची चर्चा आहे.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार
- जयंत पाटील – इस्लामपूर
- जितेंद्र आव्हाड- कळबा मुंब्रा
- बापूसाहेब पठारे- वडगाव शेरी
- नारायण पाटील- करमाळा
- रोहित आर आर पाटील- तासगाव कवठेमहाकाळ
- संदीप क्षीरसागर -बीड
- माळशिरस- उत्तमराव जानकर
- मोहोळ – राजू खरे
- अभिजीत पाटील-माढा
- रोहित पवार- कर्जत जामखेड
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार
- सुप्रिया सुळे -बारामती
- अमोल कोल्हे – शिरुर
- धैर्यशील मोहिते पाटील- माढा
- भास्कर भगरे- दिंडोरी
- बाळ्यामामा म्हात्रे – भिवंडी
- बजरंग सोनावणे – बीड
- अमर काळे- वर्धा
- निलेश लंके -अहमदनगर





