उदयनराजेंच्या भ्रष्ट कारभाराचा हिशोब सातारकर नक्कीच करतील – शिवेंद्रसिंहराजे भोसले

सातारा -दिल्लीत केंद्राच्या विविध मंत्र्यांना भेटून फोटोसेशन करायचे. निवेदन देऊन शेकडो कोटी निधीचे आकडे छापून आणायचे. पण, खरंच किती निधी आणला? आणि तुम्ही एवढे महान विकासपुरुष आहात तर सातारा लोकसभेला तुमचा पराभव करून जनतेने तुम्हाला तुम्ही केलेल्या भरीव विकासाची पोचपावती दिली का दिली, असा खोचक सवाल आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केला. उदयनराजेंच्या भ्रष्ट कारभाराचा हिशोब सातारकर नक्कीच करतील, असेही त्यांनी पत्रकात म्हटले आहे.
उदयनराजे भोसले यांनी केलेल्या टीकेला शिवेंद्रसिंहराजेंनी प्रत्युत्तर दिले. आ. शिवेंद्रसिंहराजेंनी म्हटले आहे की, शासनस्तरावर विविध विकासकामांसाठी पाठपुरावा करणे लोकप्रतिनिधींचे कर्तव्यच आहे. त्यात नवीन असे काहीच नाही. नुसतं निवेदन देऊन फोटो काढायचा आणि भली मोठी आकडेवारी छापून बातमी प्रसिद्ध करायची, यातून कामे होतात का? 15 वर्ष खासदार होता.
त्यावेळी संसदेत एक दिवसही उपस्थित नव्हता. त्यावेळी का असे फोटोसेशन होत नव्हते. पालिकेच्या कार्यकालास चार वर्ष आणि आठ- दहा महिने उलटले, निवडणूक लागली की बरी तुम्हाला केंद्रीय मंत्र्यांची आठवण होत. पहिल्यांदा खासदार झाला त्यावेळी रेल्वेतून कराडला गेला.
माहुलीच्या रेल्वे स्टेशनवर मोठा स्टंट केला. पुढे कराड आणि माहुली या दोन्ही स्टेशनचा काय कायापालट केलात, केवळ शोबाजी केली, काहीतरी बदल झाला का, असा प्रश्न त्यांनी केला. केंद्र सरकारच्या माध्यमातून सातारा अथवा कराडवरून साधी नवीन जलद रेल्वे सुरु करता आली नाही, अशी टीका त्यांनी केली.





