नोव्हेंबरमध्ये घाऊक प्रवासी वाहनांच्या विक्रीत घट; दुचाकी विक्री 16% वाढली

नवी दिल्ली – लग्नाच्या मुहूर्ताचा काळ असूनही नोव्हेंबर महिन्यामध्ये घावूक प्रवासी वाहन विक्री 13.72 टक्क्यानी कमी होऊन 3,21,943 युनिट झाली. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये 3,73,140 युनिट विक्री झाली होती. शहरातील मध्यमवर्गीयांनी खरेदी कमी केल्यामुळे प्रवासी वाहन विक्रीवर परिणाम झाला असल्याचे दिसून येते.
दरम्यान ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था सुधारत असल्यामुळे नोव्हेंबर महिन्यामध्ये दुचाकी विक्री 15.8% वाढून 26,15,953 युनिट झाली. जी की गेल्या वर्षी या महिन्यात 22,58,970 युनिट होती. दुचाकीची विक्री वाढल्यामुळे एकूण वाहन विक्री 11.21% वाढून 32,08,719 युनिट झाली आहे. जी की गेल्या वर्षी 28,85,317 युनिट होती.
फेडरेशन ऑफ डीलर्स असोसिएशन या संघटनेचे अध्यक्ष सी एस विघ्नेश्वर यांनी सांगितले की, ऑक्टोबरप्रमाणे नोव्हेंबर महिन्यात विक्री वाढची अपेक्षा होती. कारण लग्नाचा हंगाम चालू झाला आहे. मात्र ग्राहकाची क्रयशक्ती कमी झाल्यामुळे वाहन विक्रीवर परिणाम कायम आहे. जर दुचाकी विक्री वाढली नसती तर एकूण वाहन विक्रीवर परिणाम झाला असता.
नोव्हेंबर महिन्यामध्ये घावूक व्यवसायिक वाहन विक्री सहा टक्क्यांनी कमी होऊन 81,967 युनिट झाली. जी की गेल्या वर्षी 87,272 युनिट होती. काही राज्यात झालेल्या निवडणुका, पावसाळ्यामुळे थांबलेले काम या कारणामुळे व्यावसायिक वाहनाच्या विक्रीवर परिणाम झाला.
नोव्हेंबर महिन्यामध्ये घावूक तीन चाकी वाहन विक्री चार टक्क्यांनी वाढून 1,08,337 झाली आहे.
घसरलेला विकासदर आणि इतर बाबी पाहता आगामी काळामध्ये वाहन विक्रीत फारशी वाढ होण्याची शक्यता कमी असल्याचे विश्लेषकांनी नमूद केले. मात्र ग्रामीण भागातून छोट्या वाहनांची मागणी वाढत राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. दुसर्या सहामाहीबाबत सरकार आशावादी आहे. त्यामुळे आगामी काळात या दृष्टिकोनातून सरकार काय उपाययोजना करते याकडे वाहन वितरकांचे लक्ष आहे.
इन्व्हेंटरीचा प्रश्न कायम –
गेल्या काही महिन्यांपासून वाहन कंपन्या वितरकाकडे कमी वाहने पाठवीत आहेत. त्यामुळे इन्व्हेंटरीची दहा दिवसांनी कमी होण्यास मदत झाली आहे. मात्र अजूनही वितरकाकडे असलेली इन्व्हेंटरी 65 ते 68 दिवसांची आहे. ती 21 दिवसांवर येण्याची आवश्यकता आम्ही अनेक वेळा व्यक्त केली आहे. कंपन्या या दृष्टिकोनातून प्रयत्न करतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.



